Gadchiroli Kids Death: गडचिरोलीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अहेरी तालुक्यातील तापाच्या उपचारासाठी रुग्णालयात न जाता पुजाऱ्यांकडे गेले. मात्र ताप आणखी वाढल्याने दोन्ही भावंडाचा मृत्यू झाला. या भागात रस्त्यांची स्थिती बिकट आहे. शववाहिका तिथपर्यंत पोहचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून 15 किमी चालत त्यांच्या मुळगावी पोहोचले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे तापाच्या उपचारासाठी आजारी असलेल्या लहान मुलांना रूग्णालयात न नेता पुजाऱ्यांकडे नेण्यात आलं. परिणामी उपचारात हयगय झाल्याने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. या भागात रस्त्यांची स्थिती बिकट आहे. शववाहिका पोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून 15 किमीपर्यंत चालत त्यांच्या गावाला पोहोचले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
४ सप्टेंबरला रमेश वेलादी यांच्या बाजीरावला (6 वर्षे) ताप आला. पाठोपाठ दिनेश (साडेतीन वर्षे) आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. मात्र काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. आधी बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी दिनेशनेही प्राण सोडले. मात्र अंतिम उपाय म्हणून पालकांनी नाले-चिखल तुडवत दोघांना जवळच्या जिमलगट्टा आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण दोन्ही मुले गमावलेल्या वेलादी दापत्याने सैरभैर होत दोन्ही शव खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे दोन्ही मुलांचे शव खांद्यावर घेऊन आई- वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली. याच अवस्थेत ते पत्तीगावला पोहोचले. या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील बेपत्ता आरोग्य सेवा, कमकुवत दळणवळण व्यवस्था आणि मूलभूत सोयींची वनवा पुन्हा एकदा पुढे आली आहे. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर अजूनही काही भागात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जातो, हे चित्र खूपच अस्वस्थ करणारं आहे.