विशाल करोळे, औरंगाबाद : तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आलं आहे. तुळजाभवानी मंदिरात सध्या ऑनलाईन दर्शन पास दिला जातोय. पण काही मंडळींनी बोगस पासच्या आधारे कसा गैरव्यवहार सुरू केला आहे.
कोरोनामुळं बंद झालेले तुळजाभवानी मंदिराचे दरवाजे आठ महिन्यांनी उघडले. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना ऑनलाईन पास घेऊन देवीच्या दर्शनाची सोय प्रशासनानं केली. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आता केला जातोय. वापरलेल्या पासाच्या झेरॉक्स काढून पुन्हा त्या भाविकांना दिल्या जात आहेत. यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे.
यावरून आता ब्लेम गेम सुरू झालाय. महसूल प्रशासनानं घोटाळ्याचा आरोप फेटाळताना पुजाऱ्यांनाच जबाबदार धरलंय. काही दोषी पुजाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यात. त्यांना लवकरच मंदिर प्रवेश बंदी केली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दूरवरून श्रद्धेनं येतात. पण या पास घोटाळ्यामुळं भाविकांच्या श्रद्धेलाच ठेच पोहोचवली जातेय. या घोटाळेबाजांना आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो, हीच देवी चरणी प्रार्थना.