पत्नीसाठी विषाचा वडापाव...; पतीच्या कटाचा सुगावा लागताच तिनं उचललं टोकाचं पाऊल

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीने पत्नीसह मुलांना संपवण्यासाठी भयानक कट रचल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 21, 2023, 12:41 PM IST
पत्नीसाठी विषाचा वडापाव...; पतीच्या कटाचा सुगावा लागताच तिनं उचललं टोकाचं पाऊल title=

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नी आणि मुलांना वडापावमधून (vada pav) विष (poison) देऊन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. कौटुंबिक वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पतीने पत्नीसह मुलांना वडापावमधून विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पत्नीच्या सतर्कतेमुळे सर्वांचा जीव वाचला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिलेने या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे आणि तिच्या पतीचे कौटुंबिक कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच संतापलेल्या पतीने पत्नीसह मुलांना संपवण्याचा कट रचला होता. पत्नीला संपवण्यासाठी पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस शेख याकूब, फुरखान यांच्या मदतीने 16 ऑगस्टच्या रात्री वडापावमध्ये विष कालवून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले होता.

मात्र वडापावचा विचित्र वास येत असल्याचे पत्नीला जाणवले. त्यामुळे तिने आणि मुलांना वडापाव खाऊ न देता तो फेकून दिला. वडापावमध्ये काहीतरी मिसळल्याचे पत्नीला कळताच तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्रांती चौक पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राठोड करत आहेत.