भाजपाची मोठी घोषणा! फडणवीसांनी राम कदम, रवी राणांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

BJP Big Announcment: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपाने मोठी घोषणा केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 25, 2025, 03:12 PM IST
भाजपाची मोठी घोषणा! फडणवीसांनी राम कदम, रवी राणांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
भाजपाची मोठी घोषणा

BJP Big Announcment: महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा आज करण्यात आली. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्य कोण असतील याची यादीच पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये भाजपाचे घटाकोपरमधील आमदार राम कदम तसेच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या रवी राणा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवल्याचं दिसत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीनं समित्यांचे नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पक्षाने सांगितलं आहे.

विविध समित्यांचे अध्यक्ष कोण आहेत पाहूयात:

> सार्वजनिक उपक्रम समिती: राहुल कुल

> पंचायत राज समिती: संतोष दानवे-पाटील

> अनुसूचित जाती कल्याण समिती: नारायण कुचे

> अनुसूचित जमाती कल्याण समिती: राजेश पाडवी

> महिला हक्क व कल्याण समिती: मोनिका राजळे

> इतर मागासवर्गीय कल्याण समिती: किसन कथोरे

> मराठी भाषा समिती: अतुल भातखळकर

> विशेष हक्क समिती: राम कदम

> धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती: नमिता मुंदडा

> आश्वासन समिती: रवी राणा

> आमदार निवास व्यवस्था समिती: सचिन कल्याणशेट्टी 

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

मंत्रालयामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाने या निर्णयांची माहिती जारी केली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमध्ये दोन नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांना मंजुरी देण्याबरोबरच एका बँकेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाने मंगळवारी दिनांत 25 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयांचा संक्षिप्त आढावा घेणारी सात निर्णयांची यादी जारी केली आहे. यामध्ये वित्त विभागाने सार्वजनिक उपक्रम, महामंडळांना ठाणे जनता सहकारी बँकेत खाती उघडण्यास परवानगी देण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाचाही समावेश आहे. याशिवाय पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावांसाठी मोठी आर्थिक मदत देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

परळी, बारामतीला प्रत्येक 564.58 कोटी रुपये

बीडमधील परळी आणि पुण्यातील बारामतीमध्ये नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणच्या नव्या महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564.58 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.