महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधीही काहीही होऊ शकते? भास्कर जाधव यांचा WhatsApp स्टेट्स चर्चेत

भास्कर जाधव यांच्या WhatsApp स्टेट्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. स्टेट्स मध्ये उल्लेख केलेला तो म्होरक्या कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.   

वनिता कांबळे | Updated: Feb 16, 2025, 06:59 PM IST
 महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधीही काहीही होऊ शकते? भास्कर जाधव यांचा WhatsApp स्टेट्स चर्चेत title=

Bhaskar Jadhav  WhatsApp Status : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधीही काहीही होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर ठाकरेंची कोकणातील एकमेव आमदार असलेले भास्कर जाधव त्यांची साथ सोडणार या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आता भास्कर जाधव यांचा व्हॉट्स ॲप स्टेट्स चर्चेत आला आहे. सकाळी पत्रकार परिषद घेतल्या नंतर संध्याकाळी भास्कर जाधव यांच्या स्टेट्समुळे संभ्रम वाढला आहे.

43 वर्षांत कुठल्याही पक्षाने क्षमतेप्रमाणे कामाची संधी दिली नाही असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केलीय. तसेच 43 वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही पदासाठी स्टटंबाजी न करता जे मिळालं त्यामध्ये समाधान मानलं असही जाधव पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संध्याकाळी भास्कर जाधव यांनी त्यांचा WhatsApp स्टेट्स अपडेट केला आहे. म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसच काय तर जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात. संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेट्स ठेवत भास्कर जाधव यांनी पुन्हा वेधलं लक्ष आहे.  स्टेट्स मध्ये उल्लेख केलेला तो म्होरक्या कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. कालच्या शिवसेनेच्या बैठकीलाही ते गैरहजर होते. मात्र भास्कर जाधव नाराज नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलीय. भास्कर जाधवांशी माझं फोनवरून बोलणं झालं. त्यांच्या घरातलं लग्न कार्य असल्याने ते येऊ शकले नाहीत.असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना UBT ला गळती लागल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पदाधिका-यांसह महत्त्वाचे नेतेही ठाकरेंना रामराम ठोकत आहेत. त्यातच शिंदेंच्या ऑपरेशन टायगरअंतर्गत कोकणातील राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरलाय. त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे..

भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार  हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.. त्याला कारणही तसंच आहे.. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही. हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केलीये आणि चर्चांना उधाण आलंय.

भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करताच शिवसेनेत त्यांचं स्वागत करु असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना शिवसेना पक्षात येण्याची ऑफर दिली.  उदय सामंतांपाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भास्कर जाधवांच्या कामाच कौतूक केलंय. भास्कर जाधव हे काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा मात्र, भाजपमध्ये जाधवांबाबत कुठलीही चर्चा नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.