Beed Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या मारेक-यांना अटक करण्यासाठी बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संतोष देशमुखांच्या मुलीनं हाक दिली होती.. तिला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत, मोठ्या संख्येनं न्यायप्रिय जनता रस्त्यावर उतरली. बीडमधल्या या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.
कोवळ्या वयात बापाचं छत्र हरवलेल्या लेकीचे शब्द काळजात हात घालणारे आहेत. आहेत. आपल्या वडिलांची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरचा लेकीचा हा आक्रोश मन पिळवटून टाकणारा आहे. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची ही आर्त हाक तुमचंही मन पिळवटून टाकेल.वैभवीनं न्यायासाठी आर्त हाक दिलीये. आणि तिच्या हाकेला ओ देत बीडमध्ये जनसागर लोटला.. आमच्या कुटुंबासोबत उभं रहा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, असं आवाहन वैभवीनं केलंय.
आंदोलनादरम्यान संतोष देशमुख यांचं कुटुंब भावनिक झाले होते.. त्यांच्या बहिणीला अश्रू अनावर झालेत. एक भाऊ गेला तरी अनेक भाऊ आमच्या सोबत असल्यानं न्याय मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
संतोष देशमुख हे आमचे भाऊ आहेत.. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या लेकीनं हाक दिल्यावर आम्ही सहभागी झाल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय.
संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आज बीडच्या प्रत्येक रस्त्यावरील माणसाच्या डोळ्यात फक्त न्यायाचीच भावना दिसून येत होती.. आजच्या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या मुलीनं दिलेल्या हाकेला बीडकरांनी मोठ्या संख्येनं साद दिली.
मी येथे भाषण ठोकायला नाही आलो. तिच्या लेकराला बाप नाही. तिच्या पाठीवर हात ठेवा. तिचा बाप गेलाय. भाषण होत राहतील पण लेकीच्या मागे उभे राहा. आता वाट बघायची नाही. जशाला तसं उत्तर द्या, आपण मराठे आहोत. पाणीच पाजायचं. आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली आहे. आरोपींना पकडणं मोठं गोष्ट नाही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. विरोधक आमचे सासरे नाहीत. आमचं लेकरु गेलंय याच दु:ख आहे. कोणाचेही उपकार विसरायचे नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांवर कमेंट लिहिली म्हणून गुन्हे दाखल केले आणि खून केलेला आरोपी तुम्हाला सापडत नाही? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहखात्याला विचारला. तुम्ही जातीवादी मंत्री पोसणार असाल तर आम्हाला दांडके हातात घ्यावे लागणार आहेत. आम्ही खवळलो तर नाव ठेवू नका. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. काही लोकांना विध्वंस घडवायचा असला तरी आम्हाला तसं करायचं नाही.