Dombivli To Mumbai New Expressway: मुंबई शहरात व मुंबई लगतच्या शहरातही लोकवस्ती वाढल्याने जवळपास सगळीकडेच वाहतूक कोंडीचा त्रास वाढत आहे. मुंबई लोकलमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मुंबईकडून बदलापूर, अंबरनाथ येथे जाण्यासाठी लोकल खचाखच भरलेल्या असतात. मात्र लवकर हा त्रास संपणार आहे. मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
कल्याण-डोंबिवलीसह कल्याणपलीकडील नागरिकांना मुंबई व नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी नवा द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गावरुन प्रवास करताना विनाअडथळा या मार्गाने प्रवास करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गाचा आराखड्याची तयारी सुरू केली आहे.
एमएमआरडीए संपूर्ण महामुंबई प्रदेशातील ६ हजार चौरस किमीहून अधिक भागात विकासकामे करीत आहे. त्यामध्ये जवळपास १२ मेट्रो मार्गिका, दोन सागरी सेतू, तीन कनेक्टर, विविध जोडमार्ग, उड्डाणपूल आदींचा समावेश आहे. मात्र त्या भागातून दररोज लाखोंच्या संख्येने मुंबईत येणाऱ्यांसाठी सध्या लोकलसेवेशिवाय अन्य मार्ग नाही. यासाठीच आता एमएमआरडीएकडून असा थेट मार्ग उभा होणार आहे.
या मार्गाचा वापर करुन बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व डोंबिवली ते मुंबई व नवी मुंबई, असा 'अॅसेस कन्ट्रोल' एमएमआरडीएकडून आराखड्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या मार्गामुळं प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा महामार्ग द्रुतगती स्वरुपाचा असेल तसंच तो राष्ट्रीय महामार्ग दर्जाचादेखील असणार आहे. दरम्यान हा महामार्ग नेमका किती पदरी करता येणे शक्य आहे, हे डीपीआर तयार करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला निश्चित करायचे आहे. यासाठी विविध प्रकारचा अभ्यास, भूसंपादनाची आवश्यकता, सर्वेक्षण हे संबंधित कंत्राटदाराने करावे. तसेच कंत्राट मिळाल्यापासून आठ महिन्यांत डीपीआर तयार करायचा असल्याचे निविदेत नमूद आहे.
मुंबई किंवा पनवेलमार्गे बदलापूरला जाण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो. मात्र लवकरच बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 25 जुलैपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सध्या पनवेलमार्गे बदलापूरला जाण्यासाठी ठाणे-डोंबिवली असा लोकलने प्रवास करावा लागतो. मात्र आता या महामार्गामुळं प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होणार आहे.