ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईकरांसोबत सर्वसामान्यांना भाडेवाढीचा फटका बसलाय. लालपरीसोबत मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलीय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 24, 2025, 12:09 PM IST
ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका? title=

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षांची सुरुवात महागाईने झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय. एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागलीय. एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलाय. शनिवारी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून एसटीच्या भाडेवाढ लागू होणार आहे. गेली 3 वर्षे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे दरवर्षी 5 टक्के प्रमाणे तीन वर्षांची 15 टक्के एसटी महामंडळानं केलीय. भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील जनतेसाठी एस.टी.चा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे. 

मुंबईकरांचाही प्रवास महागला!

एसटीपाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे.  नवीन वर्षात ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. टॅक्सीचा दर 4 प्रति किमीने तर रिक्षाचा दर 3 प्रति किमीने वाढणार आहे. त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा 28 वरुन 32 वर जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा 23 वरुन 26 वर जाईल.

रिक्षा संघटनेने वाढत्या सीएनजी भावामुळे आणि रिक्षाच्या दुरुस्तीचा खर्च वाढल्याने चालकांला भाडे परवडत नसल्याने त्यांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात आली असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. दरम्यान यापूर्वी 2022 मध्ये भाडेवाढ झाली होती. तेव्हा 2 रुपयांने भाडेवाढ झाली होती. रिक्षा पहिला मीटर हा 21 होता त्यावरून तो 23 रुपये झाला होता आणि टॅक्सीचा दर हा 25 रुपये होता. त्यावरून तो 28 रुपये झाला होता.