कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
'बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव ' या शब्दांचा खरा अर्थ जगतात ते वारकरी. संतांच्या अभंगवाणीत आणि विठ्ठलाच्या भक्तीरसात न्हाऊन गेलेल्या वारकऱ्यांसाठी वारीला जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक वाटतं. अशातच सोशल मीडियावरच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ दिवेघाटातील आहे. ज्ञानोबा माऊलींच्या दिंडी दिवेघाटातून जात होती. आईला घाट चढता येईना म्हणून एका तरुणाने चक्क त्याच्या आईला खांद्यावर घेत घाट सर केला.
कलियुगातील भक्त पुंडलिक आज वारीत पाहिला. आज काल आई वडीलांची इतकी सेवा करणारी मुलं असणं फार दुर्मिळ होत आहे. हे फक्त आणि फक्त वारीतच होऊ शकतं. असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजर्सने असं म्हटलं आहे की, या माऊलीच्या आयुष्याचं सार्थक इथेच झालं. विठ्ठलाच्या भेटीसाठी जाताना पुंडलिकासारखा मुलगा सोबत आहे, इथेच तिचं पुण्य फळाला आलं. तर एका युजर्सने अशी कमेंट केली की, भक्त पुंडलिकाची गोष्ट ऐकून होतो आज प्तत्यक्षात अनुभवली, हा साक्षात माऊलींचाच आशिर्वाद आहे. सध्या महाराष्ट्रभर वारीचा उत्साह पहायला मिळत आहे. देहू आणि आळंदी वरुन निघालेल्या माऊलींच्या पालखीने जेजुरीवरुन प्रस्थान केलं आहे. वारी जेजुरीत दाखल होताच माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळत पुष्पवृष्टीसह खंडेरायाच्या जेजुरीत स्वागत केलं. 'ज्ञानबा तुकाराम' सह 'सदानंदाचा येळकोट' असा जयघोष करत वारीने पुढील मार्गासाठी प्रस्थान केलं आहे.