'आरोग्यमंत्र्यांचा 31900000000 रुपयांचा 'महाघोटाळा'', तानाजी सावंतांवर गंभीर आरोप; घटनाक्रमच सांगितला

3190 Crore Tender Scam In Health Department: कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही? असा सवाल विचारण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 6, 2024, 08:04 AM IST
'आरोग्यमंत्र्यांचा 31900000000 रुपयांचा 'महाघोटाळा'', तानाजी सावंतांवर गंभीर आरोप; घटनाक्रमच सांगितला title=
70 कोटींचे टेंडर अचानक 3190 कोटींवर गेल्याचा आरोप (फोटो फेसबुकवरुन साभार)

3190 Crore Tender Scam In Health Department: राज्यसभा खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तानाजी सावंत यांच्या मालकीच्या कंपनीला आरोग्य विभागाने कंत्राट दिल्याचा दावा करताना त्यांनी 3190 कोटींचा घोटाळा केल्याचा उल्लेख राऊत यांनी केला आहे.

आरोग्य खात्यातील या टेंडर महाघोटाळ्याचे प्रकरण गंभीर

राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठक' या सदरामधून राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर भाष्य करताना तानाजी सावंतांवर गंभीर आरोप केलेत. "आरोग्य खात्यातील ‘लुटी’चे नवेच प्रकरण आता समोर आले. तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे विदर्भातील लोक मला भेटले. “सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री तानाजी सावंत यांनी 3190 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आरोग्य खात्यातील या टेंडर महाघोटाळ्याचे प्रकरण गंभीर आहे, पण मुख्यमंत्री व गृहमंत्री हे दोघेही तानाजी सावंत यांना वाचवीत आहेत,” असे या लोकांनी सांगितले. हे प्रकरण काय आहे?" असं म्हणत राऊत यांनी काय घडलं हे लेखातून सांगितलं आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या अनुभवशून्य कंपनीला टेंडर

"आरोग्य खात्यातील औषध खरेदी व इतर सामग्रीच्या खरेदीचे 3190 कोटी रुपयांचे टेंडर आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वतःच भागीदार असलेल्या BSA Corporation Ltd. कंपनीला दिले. या कंपनीला आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नाही. अटी व शर्तीत ही कंपनी बसत नाही. तरीही चार कंपन्या व संस्थांना डावलून आरोग्यमंत्र्यांनी स्वतःच भागीदार असलेल्या कंपनीस काम दिले. त्यामुळे आरोग्य खात्याची सर्व खरेदी आता आरोग्य मंत्र्यांचीच कंपनी करणार. मंत्र्यांच्या मर्जीतल्या BSA Corporation Ltd. कंपनीला कुठलाही अनुभव नाही. तरीही आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील मशीन्स व यंत्रणेची निगा राखण्याचे काम या अनुभवशून्य कंपनीला दिले. हा भ्रष्टाचार आहेच, पण रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे," असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> '...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

टेंडर दहशतीने मंजूर केले

तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, "आता यापुढची थक्क करणारी माहिती अशी की, जे टेंडर आता 3190 कोटी रुपयांचे होते ते टेंडर दोन वर्षांपूर्वी फक्त 70 कोटी रुपयांचे होते. ते कित्येक हजार पटीने वाढवले. मुळात आरोग्य विभागाकडे निधी शिल्लक नाही. तरीही 3190 कोटींचे टेंडर दहशतीने मंजूर केले जाते. ज्या कामास प्रशासकीय मान्यता नाही ते काम आरोग्य खात्याचे मंत्री स्वतःच्या फायद्यासाठी मिळवतात, ही बाब गंभीर आहे. या कंपनीचे मालक बाबासाहेब कदम आहेत व तानाजी सावंत यांचे ते भागीदार आहेत. कदम यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोग्य मंत्र्यांची आहे," असंही म्हटलं आहे.

12 हजार कोटींचे टेंडर देऊन अद्याप एकही रुग्णवाहिका नाही 

"महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रुग्णवाहिकेअभावी अनेकांचे मृत्यू झाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात रुग्णवाहिका नाहीत. पण रुग्णवाहिकांच्या नावावर गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपये आरोग्य खात्याने लुटले. मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी चौपट दरवाढीने 12 हजार कोटींचे रुग्णवाहिका टेंडर ‘सुमित पासिलिटीज’ व स्पेनच्या एलएसजी या कंपन्यांना दिले. बी.डी.जी. कंपनीही त्यात आहे. पण या कंपन्यांनी आतापर्यंत एकाही रुग्णवाहिकेचा पुरवठा केला नाही. आतापर्यंत 40 कोटी रुपये या ठेकेदारांना मिळाले, पण रुग्णवाहिका आल्या नाहीत. या सर्व कंपन्या नक्की कोणाच्या व हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> 'मुलांचा लसींआभावी मृत्यू पण सरकार गायींना...'; राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात...'

70 कोटींचे टेंडर अचानक 3190 कोटींचे

"आरोग्य खात्यातील या ठेकेदारीने अनेकांना प्राणास मुकावे लागले. कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही? 70 कोटींचे टेंडर अचानक 3190 कोटींचे होते. राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना हे घडते. राज्यातील 67 रुग्णालयांतील Mechanized Cleaning Service चे हे काम व त्यातला भ्रष्टाचार म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यातला अमानुष प्रकार आहे. रुग्णवाहिकेच्या नावावर लुटमार सुरू आहे ती वेगळी! प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आणि मुख्यमंत्री लाडक्या बहिणी व गायींचे रक्षण करायला निघाले आहेत. गायींना निधी, पण तापाने फणफणलेल्या मुलांना औषधे व लस नाही. कारण आरोग्य खात्याचे 3190 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आरोग्य मंत्र्यांच्या कंपनीत गेले," असं लेखाच्या शेवटी राऊतांनी म्हटलंय.