80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. आनंद म्हणजे नेमका असतो हे पहायचं असेल तर या आजोबांचं सेलिब्रेशन आपण बघायलाच हवं.  

शिवराज यादव | Updated: Feb 17, 2025, 06:32 PM IST
80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

पुण्यातल्या शिरुरमध्ये एका जत्रेत बैलगाडा शर्यत झाली. या शर्यतीतल्या एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. आनंद म्हणजे नेमका असतो हे पहायचं असेल तर या आजोबांचं सेलिब्रेशन आपण बघायलाच हवं.

बैलगाडा शर्यतीत जिंकला ट्रॅक्टर

आनंदाच्या भरात आजोबांच्या कोलांटउड्या

80 वर्षाच्या आजोबांचा व्हिडिओ तुफान व्हायरल

हा व्हिडिओ बघितला तर धोतर घातलेल्या आजोबांना हे झालंय तरी काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडेल. मात्र 80 वर्षांच्या आजोबांना आनंदच इतका झालाय की त्यांना रहावलं नाही आणि त्यांनी भररस्त्यात अशा कोलांटउड्या मारायला आणि जोर बैठका काढून आपल्या आनंदाला वाट मोकळी करुन दिली आहे. 

पुण्यातल्या शिरुरच्या वाघोलीत यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. या बैलगाडा शर्यतीत 80 वर्षांचे चांगदेव शेंडगे या आजोबांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिल्या नंबरचं ट्रॅक्टरचे बक्षीस जिंकलं.  तेव्हा त्यांना आनंदाचं चांगलंच भरतं आलं आणि चांगदेव आजोबांनी शर्यतीच्या घाटातच कोलांटउड्या मारायला आणि जोर बैठका मारायला सुरुवात केली. पांढरा सदरा, पांढरी टोपी, पांढरं धोतर नसलेले आजोबा लाल मातीत लहान पोराप्रमाणं बागडत होते.. त्यांचा हा आनंद बघून अनेकांना आनंदाची व्याख्या नव्यानं कळाली. आजोबांनी झी 24 तासवर आपला आनंद बोलून दाखवला. 

बालपणी साधं चॉकलेट मिळालं तरी मुल हरकून बागडायला लागायचं. तसाच निरागस आनंद ट्रॅक्टर जिंकल्यानंतर चांगदेव आजोबांच्या डोळ्यात दिसला. बैलगाडा शर्यतीवरचं प्रेम त्यांनी वयाच्या 80व्या वर्षीही जपलंय. आणि त्यांनी या वयात अशा उड्या मारून तब्येतही उत्तम जपलीय. यातून प्रत्येकानं प्रेरणा घ्यावी असाच हा क्षण.