मुंबई : सवंगड्यांबरोबर खेळण्याच्या वयातच एक छोटी कीर्तनकार हाती टाळ घेत हरिनामाचा गजर करत आहे. परभणीच्या छोट्या मुक्ताईची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. बोबड्या बोलांमध्ये कीर्तन करणारी ही अवघ्या सहा वर्षांची मुक्ता. परभणीच्या उघडा महादेव परिसरात राहणारी मुक्ता कीर्तनं करते. कीर्तनाच्या माध्यमातून ती अवघड अध्यात्म तिच्या बोबड्या बोलांमध्ये समजावून सांगते. आतापर्यंत या छोट्या मुक्ताईनं पन्नासच्या वर कीर्तनं केली आहेत.
मुक्ताची आजी शशिकला झाडे या भजन-कीर्तन करतात. मुक्ता दोन वर्षांची असल्यापासूनच ओव्या आणि श्लोक म्हणते. गावोगावी मुक्ताची कीर्तनं आणि प्रवचनं होतात. मुक्ताला अनेक अभंग,पावल्या,हरिपाठ,हनुमान स्रोत,गवळणी आणि संस्कृत श्लोकही पाठ आहेत. आणि ते हे सगळं आपल्या किर्तनात बोलून दाखवते.
मुक्ता आता संगीताचे ही शिक्षण घेत आहे. तिच्याबरोबर आता तिची दोन वर्षांची बहीणही मुक्ताबरोबर कीर्तनाला साथ देऊ लागली आहे. मुक्ताईच्या कीर्तनाचे हे बोबडे बोल अवघ्या परभणीत कौतुकाचा विषय ठरले आहेत.