Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का शुभ मानले जातात? कशी सुरु झाली परंपरा?

Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या सणाला धार्मिक महत्त्व तर आहेत शिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक सण आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 6, 2025, 06:47 PM IST
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का शुभ मानले जातात? कशी सुरु झाली परंपरा?  title=
Makar Sankranti 2025 Tilgul

Makar Sankranti 2025 : वैदिक पंचांगानुसार जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्याला सूर्य मकर संक्रांत असं म्हटलं जातं. भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रात, कुठे पोंगल म्हणून साजरा होता. प्रदेशानुसार मकर संक्रांतीला विशेष पदार्थ केला जातो. पण यात खास असतो तो तिळगुळ लाडू. हो, तिळाचे लाडू खाणे शुभ मानले जाते. पण कधी हा विचार केला आहे का? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवतात? ही परंपरा कशी सुरु झाली. 

मकर संक्रांतीचे महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान करतात. विशेषत: तीळ दान करणे आणि तीळ आणि गूळ खाणे खूप फायदेशीर आणि शुभ मानले जाते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवून सेवन करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात आवर्जुन तिळ गुळ वाटताना म्हणतात की, तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. 

 

हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2025 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांती? जाणून घ्या योग्य तिथी, स्नान - दान शुभ मुहूर्त

 

तिळाचे लाडू बनवण्याची परंपरा कशी सुरु झाली?

तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा पौराणिक कथांशी जोडलेली आहे. एकदा भगवान सूर्य आपला मुलगा शनिदेवावर खूप कोपला होता. शनिदेवाने आपल्या सामर्थ्याने कुंभ राशीचे घर जाळले म्हणून तो संतापला होता. यानंतर शनिदेवाने वडिलांची माफी मागितली आणि सूर्याचा राग शांत झाला.

भगवान सूर्याने शनिदेवाला सांगितलं की जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचं घर समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल. मकर हे शनिदेवाचे आवडते घर आहे. यानंतर शनिदेवाने वडिलांची पूजा करण्यासाठी तीळ आणि गूळ अर्पण केला. तीळ आणि गुळामुळे भगवान सूर्य प्रसन्न झाले आणि ते शनिदेवावर प्रसन्न झाले. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे.

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते. त्याचबरोबर नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तिळाचे लाडू खाल्ले तर प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

तिळाचे लाडू आरोग्यासाठी फायद्याचे (Benefits Of Sesame Seeds)

छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर असते. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. तिळात कॅल्शियम तर असतंच, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. दातांच्या मजबुतीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.

तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत. उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)