Shirish Maharaj Sucide Note: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर तीर्थक्षेत्र देहू गावात एकच खळबळ उडाली. शिरीष महाराज हे 30 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले आहे. शिरीष महाराज यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी आता समोर आली आहे.
शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले? याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दडलंय. पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला अन चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिलाय.
या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येमागचं कारण ही समोर आलंय. माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. पैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या. अशी विनंती महाराजांनी मित्रांना केली.
मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग. असं ही चिठ्ठीत नमूद केलेलं आहे.