Lifetime Toll Pass And Annual Toll Pass : भारतात अनेक मोठे महामार्ग तयार झाले आहेत. तर, अनेक मोठे महामार्ग हे प्रगतीपथावर आहे. या महामार्गांमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुखद झाला आहे. या महामार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना टोल भरावा लागतो. टोल भरताना प्रवाशांना बराच वेळ टोल प्लाजावर जातो. तर, वारंवार टोल भरावा लागत असल्याने प्रवासी देखील वैतागतात. मात्र, लकरच वार्षिक आणि लाइफ टाइम टोल पासची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. लाईफ टाइम टोल पास साठी एकदाच प्रवाशांना 30 हजार रुपये भरावे लागणार आहेत. या लाईफ टाइम टोल पासमुळे एकदा पैसे भरल्यावर प्रवाशांना आयुष्यभर भारतात कुठेही टोल न भरता फिरता येणार आहे.
विविध राज्यात टोलचे शुल्क हे वेगवेगळे असते. तसेच वेगवेगळ्या महामार्गावर वेगवेगळ्या रकमेचा टोल आकारला जातो. एका विशिष्ट मार्गावरुन प्रवास करणाऱ्याना प्रवाशांचे मोठी रक्कम टोल भरण्यात जाते. तसेच लांब पल्ल्याच्या टूरवर जाताना प्रवासाचे बेजट बनवताना प्रवाशांना टोलच्या शुल्काची रक्कम विचारात घेऊन बजेट बनवावे लागते. यामध्येही प्रवास खर्चातील मोठी रक्कम ही टोल भरण्यात खर्च होते. मात्र, या सुविधेमुळे प्रवाशांची टोल भरण्याच्या कटकटीतुन सुटका होणार आहे.
महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी टोल सुविधा सुरु करण्याची सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना Annual Toll Pass आणि Lifetime Toll Pass अशी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. वार्षिक टोल पाससाठी प्रवाशांना एकदा 3 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर, 15 वर्षांचा आजीवन पास अर्थात लाईफ टाईम टोल पाससाठी 30 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशा प्रकारचे पास काढणाऱ्या प्रवाशांना कोणत्याच टोल नाक्यावर कोणताही टोल भरावा लागणार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ते वाहतूक मंत्रालय या टोल पासच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत आहे. हा पास फास्टॅगमध्येच जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची वेळेची बचत तर होईलच, शिवाय पुन्हा पुन्हा टोल भरण्याचा त्रासही दूर होईल.