उत्तर प्रदेशातील सितापूर येथे एका दांपत्याची लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित दांपत्याच्या मुलाचं आरोपींपैकी एकाच्या मुलीशी प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच ही हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. हल्ल्यात अब्बास आणि त्यांची पत्नी कमरुल निशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सीतापूरचे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितलं आहे की, काही वर्षांपूर्वी अब्बास यांचा मुलगा शेजारच्या घरातील एका मुलीसोबत पळून गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अब्बास यांच्या मुलाची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
अब्बास यांच्या मुलाची काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटका करण्यात आली होती. यानंतर आरोपी कुटुंबातील काही जणांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट आखला होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
"गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास आणि कमरुल निशा यांचा मुलगा शौकतचे शेजारी राहणाऱ्या रामपाल यांची मुलगी रुबीशी प्रेमसंबंध होते. 2020 मध्ये शौकतने रुबीचं अपहरण केलं होतं. त्यावेळी रुबी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर शौकतची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती. पण जून महिन्यात शौकतने पुन्हा एकदा रुबीचं अपहरण केलं आणि तिच्याशी लग्न केलं," अशी माहिती चक्रेश मिश्रा यांनी दिली आहे.
हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. दरम्यान हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी याप्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत.