सत्तेत आल्यास गरीबांच्या बॅंक खात्यात 72 हजार देऊ- राहुल गांधी

गरीब परिवारांना वार्षिक 72 हजार रुपये त्यांच्या बॅंके खात्यात थेट देऊ असे राहुल म्हणाले. 

Updated: Mar 25, 2019, 05:00 PM IST
सत्तेत आल्यास गरीबांच्या बॅंक खात्यात 72 हजार देऊ- राहुल गांधी  title=

नवी दिल्ली : लोकसभा 2019 च्या रणसंग्रामात काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आपण सत्तेत आलो तर गरीब परिवारांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रुपये देऊ अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. किमान मूलभूत उत्पन्न हमी योजनेनुसार गरीब परिवारांच्या बॅंक खात्यात ही रक्कम गोळा केली जाईल. गेल्या पाच वर्षांमध्ये गरीबांना खूप हाल सहन करावे लागले. आम्हाला त्यांना न्याय द्यायचा आहे. यासाठी आम्ही त्यांना मूलभूत उत्पन्न हमी योजनेचा लाभ देऊ इच्छितो. या योजनेनुसार गरीब परिवाराची मासिक कमाई किमान 12 हजार रुपये असेल. आम्ही भारतातील गरीब परिवारांना वार्षिक 72 हजार रुपये त्यांच्या बॅंके खात्यात थेट देऊ असे राहुल म्हणाले. 

पंतप्रधान मोदी जर श्रीमंतांचे कर्ज माफ करु शकतात तर काँग्रेस पार्टी देशाच्या 20 टक्के गरीब परिवारांना वार्षिक 72 हजार देऊ शकते. पाच कोटी परिवारांसाठी म्हणजेच 25 कोटी लोकांना याचा थेट फायदा मिळणार आहे. या योजनेचा थेट लाभ देशातील 5 कोटी परिवारांना म्हणजेच साधारण 25 कोटी लोकांना होईल. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नसल्याचे राहुल म्हणाले. 

याआधी काँग्रेसने 2009 मध्ये मनरेगाचा प्रयोग केला आहे. याआंतर्गत देशातील ग्रामीण परिवारांना 100 दिवसांच्या रोजगाराची गॅंरटी देऊन काँग्रेसने ग्रामीण भारतात चांगली पकड तर बनवली आणि पुन्हा सत्तेत देखील आली. 2007 मध्ये यूपीए-1 ने शेतकऱ्यांचे साधारण 70 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. 2018 च्या शेवटपर्यंत पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख राज्य मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कर्जमाफीचे आश्वासन देत काँग्रेस सत्तेवर आली आहे.

दोन मतदारसंघातून ?

२३ मार्चला केरळचे काँग्रेस अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राहुल गांधी हे अमेठी ऐवजी वायनाड मधून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु झाली आहे. केरळच नाही तर या शिवाय राहुल गांधी हे मध्य प्रदेश, कर्नाटक किंवा तमिळनाडुमधून देखील निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. पण राहुल गांधी हे अमेठीमधून निवडणूक लढवण्यासाठी तयार नाहीत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. अमेठीमधून विजयाचा विश्वास नसल्याने ते दुसऱ्या जागेवरुन निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी हे २००४ पासून अमेठीमधून खासदार आहेत. २००४ आणि २००९ मध्ये राहुल गांधी यांचा मोठा मताधिक्यांनं विजय झाला होता. पण २०१४ मध्य़े मात्र त्यांना मोठा धक्का बसला होता. स्मृती इराणी यांनी येथे आपला जनसंपर्क वाढवला आहे. २०१४ च्या पराभवानंतर ही त्या अमेठीचा दौरा करत होत्या. त्यामुळे त्यांना येथे विजयाचा विश्वास आहे.