Bank Statement Tips: बँक स्टेटमेंट (Bank Statement) म्हणजे एका निश्चित कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यावरुन नेमका किती पैशांचा व्यवहार झाला याचा रेकॉर्ड. बँक (Banking) स्टेटमेंट अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहारांचा पुरावा म्हणून महत्त्वाचं ठरतं. यामध्ये तुमच्या बँक खात्यावरुन (Bank Account) नेमकी कधी, कोणते आणि किती रुपयांचे व्यवहार झाले आहेत याचा सविस्तर तपशील असतो. स्टेटमेंटमध्ये डिपॉझिट, चार्ज, विड्रॉअल आणि कोणत्याही ठराविक कालावधीमध्ये खात्यावर किती पैसे होते आणि आता किती आहेत याची माहिती असते. आता सर्वसामान्यपणे पडणारा प्रश्न म्हणजे बँक खातेधारकांना आपल्या बँक अकाऊंटचं स्टेटमेंट किती कालावधीमध्ये काढलं पाहिजे. खास करुन एका वर्षामध्ये नेमकं किती वेळा बँक स्टेटमेंट पहावं असं या विषयामधील तज्ज्ञ सांगतात. नियमितपणे बँक स्टेटमेंट तपासण्याचा काय फायदा असतो. असं न केल्यास नेमका काही तोटा होतो का हे आपण आज जाणून घेणार आहोत.
आश्चर्याची बाब म्हणजे बँकेचं खातं असणाऱ्या अनेकांना आपण बँक स्टेटमेंट नेमकं किती कालावधीनंतर चेक केलं पाहिजे हे ठाऊक नसतं. एका आकडेवारीनुसार 10 बँक खातेदारांपैकी 8 जणांना वर्षभरामध्ये नेमकं किती वेळा बँक स्टेटमेंट चेक करावं हे ठाऊक नसतं. एखाद्या ठिकाणी बँक स्टेटमेंट मागवलं तरच खातेधार बँक स्टेटमेंट काढतात. आजकाल अनेक बँका एका ठराविक कालमर्यादेनंतर बँक स्टेटमेंट ईमेलवर पण पाठवतात. मात्र अनेकजण या ऑनलाइन बँक स्टेटमेंटकडेही दुर्लक्ष करतात. बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांनुसार बँकेचं खातं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दर 4 महिन्यांनी एकदा बँक स्टेटमेंट तपासलं पाहिजे. म्हणजेच वर्षातून किमान 3 वेळा बँक स्टेटमेंट काढणं फायद्याचं ठरतं. अशाप्रकारे दर 4 महिन्यांनी बँक स्टेटमेंट काढल्यास खातेधारकाच्या खात्यावरुन काही पैसे नकळत वळवण्यात आलेत किंवा फसवणूक झाल्याचं लगेच लक्षात येतं. तसेच बँकांनी सेवांसाठी अधिक पैसे आकारले असतील तर ते सुद्धा खातेधारकांना बँक स्टेटमेंटवरुन समजतं.
बँक खात्यांमधून होणारी फसवणूक ही आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात सामान्य बाब झाली आहे. त्यामुळेच बँक स्टेटमेंट हे अशाप्रकरणांमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून खातेधारकांच्या खात्यावरुन काही फसवणूक झाली आहे की नाही हे सहज तपासता येतं. तुमच्या खात्यावर पैसे कुठून येत आहेत आणि ते कुठे जात आहेत याची माहिती तुम्हाला बँक स्टेटमेंटमधून मिळते. या माहितीची सविस्तर नोंद बँक स्टेटमेंटमध्ये असते.
संबंधित बँक खात्यावरुन झालेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद बँक स्टेटमेंटमध्ये असते. तुम्ही कारण नसताना अधिक पैसे खर्च करत असाल तर त्याची जाणीवही तुम्हाला बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर सहज होते. उदाहर्णार्थ कार्डच्या माध्यमातून भरलेली हॉटेलची बिल, ऑनलाइन शॉपिंग सारख्या खर्चांची माहिती तुम्हाला बँक स्टेटमेंटमध्ये सहज दिसते. त्यामुळेच बँक स्टेटमेंट काढल्यास तुम्ही भविष्यात असे खर्च टाळण्यासंदर्भातील नियोजन करुन अधिक बचत करु शकता.
अनेक बँका देवाण-घेवाणीवर काही ठराविक रक्कम कापून घेतात. बँका फिजिकल अकाऊंट डिटेल्स, डुप्लीकेट पासबुक जारी करणे, डेबिट कार्ड फी यासारख्या सेवांसाठी पैसे आकारते. दर महिन्याला तुम्ही बँक स्टेटमेंट चेक केलं तर तुम्हाला या सेवांसाठी नेमके किती पैसे आकारले जातात हे समजू शकते. बँक तुमच्याकडून अधिक पैसे घेत असेल तर तुम्ही यासंदर्भात तक्रार दाखल करु शकता.