मुंबई : आपल्याला पैसे जमा करुन ठेवायचे असतील तर ते आपण बँकेत ठेवतो, कारण आपले पैसे बँकेत जास्त सुरक्षित आहे असे सगळ्यांनाच वाटत असते. परंतु असे ही अनेक लोकं आहेत, जे संभ्रमात असतात की, आपण बँकेत पैसे जमा करावेत की नाही. विशेषत: 5 लाखांपेक्षा जास्त ठेवी ठेवण्याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका असतात. अशा परिस्थितीत ठेवीबाबत बँकेचे नियम काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
हे लक्षात घ्या की, पाच लाखांपेक्षा जास्त पैसे बँकेत जमा करु नये असा कोणता ही नियम नाही. नियमानुसार बँकेचा जर दिवाळा निघाला, तर सरकारकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. म्हणजेच बँक बुडली किंवा त्याचा दिवाळा निघाला तर सरकार तुम्हाला पाच लाख रुपये देईल. कदाचित याच कारणामुळे लोकांना वाटत असेल की 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवू नये.
सरकार अडचणीत असलेल्या बँकेला बुडू देत नाही आणि ती मोठ्या बँकेत विलीन करते. बँक बंद पडल्यास सर्व खातेदारांना पेमेंट करण्यासाठी DICGC जबाबदार आहे. या रकमेची हमी देण्यासाठी DICGC बँकांकडून प्रिमियम आकारते.
तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवू शकता. मात्र, तुमच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोताचा ठोस पुरावा असला पाहिजे, म्हणजेच आयकर विभागाने विचारले असता, पैसे कोठून आले हे सांगावे लागेल. तुम्ही नियमानुसार कर भरलात, तुमच्याकडे उत्पन्नाचा योग्य पुरावा असेल तर कोणतीही अडचण येणार नाही.
तुमच्या बँक खात्यात जास्त पैसे असतील आणि तुम्ही त्या पैशाचा स्रोत इन्कम टॅक्ससमोर सिद्ध करू शकत नसाल, तर अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते, अशा परिस्थितीत तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
यासोबतच बचत खात्यात जास्त पैसे ठेवण्यापूर्वी नफा-तोट्याची काळजी घेतली पाहिजे कारण ठेवीवरील व्याज कमी आहे. त्यामुळे बचत खात्यात जास्त पैसे ठेवण्याऐवजी फिक्स डिपॉझिट करा किंवा हे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवा, तर त्यावर जास्त व्याज मिळेल, असा अनेकांचा समज आहे.