मुंबई: अलाहबादचं नाव बदलून काही दिवस उलटत नाहीत तोच भारतातील आणखी एका प्रसिद्ध शहराचं नाव बदलण्यात येण्याची चिन्हं आहेत. पर्यटकांची तोबा गर्दी असणारं ते शहर म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमधील सरकारने शिमला शहाराचं नाव बदलण्याचा विचार केल्याचं कळत आहे.
हिंदुत्त्ववादी संघटनांकडून ब्रिटीश साम्राज्याची सर्व चिन्हं मिटवण्याच्या मोहिमेअंतर्गतच आता शिमलाचं नव बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. हिमाचल सरकार शिमलाचं नाव बदलून 'श्यामला' असं ठेवणार असल्याचं कळत आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार दसरा सणाच्या निमित्ताने जाखू मंदीर येथे आलेल्या जय राम ठाकूर यांनी यासंबंधीचं सूचक वक्तव्य केलं.
इंग्रज येण्यापूर्वी हे शहर 'श्यामला' या नावाने ओळखलं जायचं. आता सरकार याविषयी जनतेची मतं विचारात घेणार जेणेकरुन शहराचं नाव बदलण्याविषयी योग्य निर्णय घेतला जाईल.
शिवाय शहरातील डलहौसी, पीटरहॉप, रिज, स्कँडल या ठिकांची नावंही बदलली जाणार असल्याचं कळत आहे.
कित्येक वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेकडून शिमलाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली होती. पण, शिमला हेच नाव जगप्रसिद्ध असल्याचं सांगत २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी ही मागणी फेटाळली होती.