Dyanpith Awarad: प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 58 व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच संस्कृत पंडित रामभद्राचार्य यांनादेखील हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
ज्ञानपीठ निवड समितीकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांची निवड करण्यात आली आहे. PTI ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत.
गुलजार यांनी 1963 मध्ये बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांच्या कवितांनी हिंदी संगीत विश्वात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. जगातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्काराने गुलजार यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2009 च्या 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटातील गीतांसाठी हा पुरस्कार मिळाला. गुलजार यांना 'जय हो'साठी ग्रॅमी पुरस्कारही मिळाला होता. 1972 मध्ये आलेल्या 'कोशिश' या चित्रपटासाठी त्यांना सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 1976 मध्ये 'मौसम'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2014 मध्ये गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पंडित रामभद्राचार्य हे एक शिक्षक, संस्कृत विद्वान, तत्वज्ञानी, लेखक, संगीतकार, गायक, नाटककार, बहुभाषिक आणि 80 ग्रंथांचे लेखक देखील आहेत. रामभद्राचार्य हे धर्म चक्रवर्ती तुलसी पीठाधीश्वर म्हणून ओळखले जातात. ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. रामभद्राचार्य हे त्यांच्या असामान्य कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी समर्पित केले. अंध असूनही त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने अनेक भाकिते केली. त्यातील अनेक खरी ठरली. त्यांना 22 भाषा अवगत आहेत.
ते जगातील पहिले अपंग विद्यापीठही चालवत आहेत.