DA hike for Central government employees: देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. केंद्रीय कर्मचारी मोठ्या आतुरतेने या वाढीची वाट पाहत होते. आता त्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. कर्मचाऱ्यांना महागाईच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. जेव्हा महागाई वाढते तेव्हा सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करते. जेणेकरुन महागाईतील वाढत्या खर्चातही कर्मचारी आपला खर्च सहजपणे भागवू शकतात.
डीएमध्ये वाढ झाली याचा थेट अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. ही वाढ बेसिक सॅलरीच्या आधारावर असेल. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा देणे हा महागाई भत्ता देण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
सध्या डीए 50 टक्के आहे. आता सरकारने यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के डीए लागू होईल. यामुळे 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे.
महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत तीन महिन्यांची थकबाकी आणि वाढलेला डीए एकत्र मिळेल.
केंद्र सरकार वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ करते. ही वाढ सर्वसाधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून होते. जानेवारीमध्ये होणाऱ्या डीए वाढीची घोषणा मार्च महिन्यात होळीच्या आसपास होते. तर जुलैमध्ये होणाऱ्या डीए वाढीची घोषणा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या आसपास केली जाते.