इटावा : इटावाहून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येतोय. सर्व शिक्षा अभियानांतर्गत डायट परिसरात मूक-बधिर मुलांच्या कॅम्पचा हा व्हडिओ आहे. व्हिडिओमध्ये केअरटेकरनं क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडलेल्या दिसत आहेत. या व्हिडिओत केअरटेकर या मुलांना प्लास्टिकच्या पाईपनं अत्यंत क्रूरतेनं मारहाण करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ मार्च रोजी घडलीय... या घटनेचा व्हिडिओ मंगळवारपासून वायरल होतोय. त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आलं.
हा अत्यंत क्रूर आणि धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर जिल्हा बेसिक शिक्षा अधिकाऱ्यांकडून आरोपी केअरटेकरविरुद्ध सिव्हिल लाईन स्टेशनमध्ये खटला दाखल करण्यात आलाय. आरोपी केअरटेकर सूरज सिंह आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत फरार झाला होता. परंतु, पोलिसांनी कंबर कसल्यानंतर काही तासांतच तो पोलिसांसमोर हजर झाला.
वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये केअरटेकर मुलांना इतक्या क्रूरपणे मारहाण करत आहे की तो पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करेल. या घटनेत दोन मुलं बेशुद्ध झाल्याचंही समजतंय.