नवी दिल्ली: कोरोनाच्या साथीनंतर चीनमुळं भारतावर आणखी एक संकट ओढवणार आहे. या संकटाची चाहूल लागणार असल्याचं दिसत आहे. हे संकट आहे पाण्याचं. निसर्गाला आव्हान देत चीननं हवामान बदलाचा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळं भारतात पडणा-या मान्सूनच्या पावसावर परिणाम होण्याची भीती आहे.
भारताला अडचणीत आणण्याची एकही संधी चीन सोडत नाही. चीनचं सुल्तानी संकट भारतावर कायम असतंच, पण आता चीनच्या अस्मानी संकटाचा मुकाबला भारताला करावा लागण्याची शक्यता आहे. निसर्गावर मात करण्यासाठी चीननं हवामान बदलाचा प्लॅन तयार केला आहे.
हवामान बदलावर चीन दरवर्षी 3 कोटी डॉलर्स खर्च करतं आहे. त्यानुसार कृत्रिम पाऊस पाडण्याची चीनची योजना आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणात क्लाऊड सिडिंग सुरू आहे. मात्र त्यामुळं भारतातील हवामान बिघडण्याचा धोका आहे.
पावसाअभावी भारतात दुष्काळ पडण्याची भीती आहे. हवामान बदलाच्या माध्यमातून चीननं पडद्याआडून भारताविरुद्ध वेगळीच लढाई सुरू केली. 1967 मध्ये अमेरिकेनं व्हिएतनाम युद्धात 'ऑपरेशन पोपये' राबवलं. त्यानुसार कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाऊड सिडिंग करण्यात आलं
पावसामुळं महापूर येऊन व्हिएतनामची रसद ठप्प झाली. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात पाऊस बेरंग करणार अशी चिन्हं होती. मात्र चीननं तब्बल अकराशेहून अधिक रॉकेट सोडून पावसाचे ढग पुढे ढकलले.
आता तर हवामान बदल टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालीय की, याच्या मदतीनं समुद्र, ढग आणि पर्यावरणाशी छेडछाड करता येऊ शकते. चीननं आधीच ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह बदलण्याचा खटाटोप केला.
चीन योग्य माहिती पुरवत नसल्यानं दरवर्षी ब्रह्मपुत्र आणि सतलजसारख्या नद्यांना महापूर येऊन भारतात मोठं नुकसान होतं. 2005 मध्ये लडाखमध्ये ढगफुटी होऊन प्रचंड वित्तहानी झाली. त्यामुळं चीनचा हवामान बदल कार्यक्रम भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.