'धन स्त्री घेऊन गेली,' चहलला घटस्फोट दिल्यानंतर कथित 60 कोटींची पोटगी घेणारी धनश्री ट्रोल; कुटुंब म्हणालं 'अशी रक्कम...'

Dhanashree Verma  Trolled: भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाला आहे. 19 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान धनश्रीने कथितपणे 60 कोटींची पोटगी घेतली असल्याने तिला ट्रोल केलं जात आहे.     

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2025, 07:06 PM IST
'धन स्त्री घेऊन गेली,' चहलला घटस्फोट दिल्यानंतर कथित 60 कोटींची पोटगी घेणारी धनश्री ट्रोल; कुटुंब म्हणालं 'अशी रक्कम...'

Dhanashree Verma Trolled: भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. 19 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. कोर्टात दोघांनीही आपला निर्णय सांगण्याआधी न्यायाधीशांनी 45 मिनिटं त्यांचं समुपदेशन केलं. कोर्टात दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. दोघांनी सुसंगतेची समस्या असल्याने विभक्त होत असल्याचं कोर्टाला सांगितलं आहे. 

दरम्यान घटस्फोटानंतर धनश्री वर्माला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. धनश्री वर्माने कथितपणे 60 कोटींची पोटगी घेतल्याचा दावा आहे. यावरुन नेटकरी संताप व्यक्त करत असून तिला खरीखोटी ऐकवत आहेत. 

एकाने लिहिलं की, "60 कोटी मिळाल्याचा केवढा आनंद". तर एकाने तिला सोशल मीडियावर अनफॉलो करा असं आवाहन केलं आहे. तसंच एका नेटकऱ्याने 'धन घेऊन गेली स्त्री' अशी कमेंट केली आहे. 

याआधी धनश्रीने 'आज तर केक झाला पाहिजे,' अशा कॅप्शनसह एक फोटो पोस्ट केला होता. जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतर तिने ही पोस्ट शेअर केला होता. यानंतर एका युजरने त्यावर कमेंट केली की, "60 कोटी मिळाल्याच्या गर्वात केक तर झालाच पाहिजे".

दरम्यान युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात नेमकी कोणती आर्थित तडजोड झाली आहे याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या तरी फक्त अंदाज लावले जात आहेत. 

पोटगीवर धनश्रीचं कुटुंब झालं व्यक्त

60 कोटींच्या पोटगीच्या दाव्यावर धनश्रीचं कुटुंबही व्यक्त झालं आहे. "पोटगीच्या रकमेबद्दल प्रसारित होणाऱ्या निराधार दाव्यांमुळे आमचा खूप संताप झाला आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, अशी कोणतीही रक्कम कधीही मागितली गेली नाही किंवा देऊही केली गेली नाही," असं तिच्या कुटुंबातील एका सदस्याने लाइव्हमिंटला सांगितले.

"या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. अशी चुकीची माहिती प्रकाशित करणे, केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे  तर त्यांच्या कुटुंबियांनाही अनावश्यक अनुमानांमध्ये ओढणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे," असंही सदस्याने पुढे म्हटले.

"अशा बेजबाबदार रिपोर्टिंगमुळे केवळ नुकसान होते आणि आम्ही माध्यमांना चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी संयम बाळगण्याची आणि तथ्य तपासण्याची विनंती करतो आणि प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो," असे त्यांनी पुढे म्हटले.