मुंबई : व्यक्ती सुंदर दिसण्यामागे त्वचा आणि कपड्यांसोबतच केसही महत्वाचे आहेत. कारण जर व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील किंवा कमी असतील तर ती व्यक्ती विचित्र किंवा वेगळीच दिसू लागते. त्यामुळे केसांची काळजी घेणं हे फारच गरजेचं आहे. आपले केस काळे, घनदाट आणि लांब असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु यासाठी त्यांची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
कारण केसांची काळजी न घेतल्याने ते कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. ज्यानंतर ते तुटायला किंवा गळायला लागतात. तुम्हाला देखील केस गळतीची समस्या येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
योग्य माहिती नसल्यामुळे लोक पुन्हा पुन्हा तिच तिच चुक करतात. तुम्हीही रात्रीच्या वेळी अशा चुका करत आहात? चला जाणून घेऊ.
केसांची निगा राखण्याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत, त्यातील एक म्हणजे रात्री केस बांधून झोपणे. केस घट्ट बांधून झोपल्याने टाळूच्या रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात. याशिवाय सकाळी उठल्यावर केसांमध्ये कंगवा वापरताना केस तुटण्याचा धोका असतो. केस घट्ट बांधून झोपल्याने ते ताणतात आणि मुळे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे असं करु नका. केस खुले ठेवा किंवा सैल ठेवा.
आंघोळ केल्यानंतर ओल्या केसांमध्ये झोपणे ही मोठी चूक आहे. अनेक वेळा लोक आळसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असे करतात, परंतु असे सतत होत असेल, तर केस गळणे निश्चित आहे. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात आणि जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल, तर शक्य असल्यास केसांमध्ये एवोकॅडोचा हेअर मास्क लावा.
बऱ्यातदा लोक वारंवार केसांना हात लावण्याची चूक करतात. रात्री झोपण्यापूर्वी ते केसांशी छेडछाड करतात. ही चूक रोज केल्याने केस गळू लागतात. यामुळे तणाव वाढतो, तसेच केस तुटण्याची किंवा गळण्याची समस्या कायम राहाते. त्यामुळे आजपासूनच ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)