Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या

Breast Cancer Awareness Month: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 27, 2024, 09:43 PM IST
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या  title=
Photo Credit: Freepik

Breast Cancer Treatment: स्तनाचा कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु काही घटक  आजराची जोखीम वाढवतात. विशेषत: तुमचे वाढते वय. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना जास्त धोका असतो, म्हणूनच या वयाच्या आसपास मॅमोग्राम सारखी नियमित तपासणी करण्याची शिफारस केली जाते. तर, स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे? याबद्दल जाणून घेऊयात  न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळा व्यवस्थापकीय संचालक, डॉ. अजय शहा यांच्याकडून...  

काही महत्वाचे घटक

> 40 पेक्षा जास्त वयाच्या महिलांना जास्त धोका असतो. 50 किंवा त्याहून जास्त वयाच्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग असल्याचे दिसून येते, तरीही संभाव्य धोका टाळण्यासाठी लवकर तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.
> कौटुंबिक इतिहास: जर आई, बहीण किंवा मुलगी सारख्या जवळच्या नातेवाईकांपैकी कुणाला स्तनाचा कर्करोग झालेला असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता वाढते. स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास खासकरून जर तरुण वयात झाल्याचे निदान झाले असल्यास तुमच्या बाबतीत
अनुवांशिक धोका जास्त आहे.
> आनुवंशिक घटक: काही लोकांच्या बाबतीत, बीआरसीए1 आणि बीआरसीए2 सारख्या विशिष्ट जनुकांमध्ये बदलाचा वारसा मिळतो, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत असे काही असल्यास अनुवांशिक चाचणीचा विचार केला जाऊ
शकतो.
> जीवनशैली: धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, जास्त वजन अशा जीवनशैली संबंधित घटकांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. निरोगी जीवनशैली ठेवल्यास धोका कमी होऊ शकतो.
> हार्मोन एक्सपोजर : हार्मोन रीप्लेसमेन्ट थेरपीचा (एचआरटी) दीर्घकालीन वापर किंवा वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले मूल झाल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

या गोष्टींचा विचार करता, वयाची 40 वर्षे पूर्ण झालेल्या महिलेने चाचण्या करून घेण्यास सुरूवात करणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्याने उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते. मॅमोग्राम्स अर्थात छातीचा एक्स-रे ज्यामध्ये जाणवण्या पेक्षा लहान असलेले ट्यूमर्स लक्षात येतात. स्तनाच्या कर्करोगाची लवकर माहिती मिळाल्यास तो लहान असताना आणि पसरलेला नसताना त्याच्या वर केलेले उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे जीव वाचू शकतात. बऱ्याच महिलांना धोका जाणवत देखील नसेल परंतू कुणालाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, आणि त्याची लक्षणे सुरुवातीच्या स्थितीत असताना जाणवत नाहीत. तुमच्या संरक्षणासाठी नियमित तपासणी हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या कुटुंबात जरी कुणाला स्तनाचा कर्करोग झाला नसेल किंवा संभाव्य धोके नसले तरी वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्करोगाचे लवकर निदान व्हावे म्हणून मॅमोग्राम करून घेतल्याने उपचार करणे सोपे आणि अधिक परिणामकारक ठरते. थोडक्यात, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया, विशेषत: ज्यांना कौटुंबिक इतिहास किंवा जीवनशैलीच्या समस्यांसारख्या जोखीम घटक आहेत, त्यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीला प्राधान्य दिले पाहिजे.