मागील दहा वर्षांपासून 'मर्दानी' फ्रॅन्चायझी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चित्रपटांची ही शृंखला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या महिला केंद्रित फ्रॅन्चायझींपैकी एक. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर सिनेरसिकांच्या मनात एक विशेष स्थानही निर्माण केले आहे. 'मर्दानी 2' च्या यशानंतर 'मर्दानी 3' ही अधिक रोमांचक कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राणी मुखर्जीचा उत्साह
राणी मुखर्जीनेही 'मर्दानी 3' ची घोषणा करताना आपला आनंद व्यक्त केला. 'मला खूप अभिमान वाटतोय की मी पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या भुमिकेने मला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळवून दिले. हा चित्रपट मी त्या सर्व नि:स्वार्थ पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित करीत आहे, जे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात', असे ती म्हणाली.
राणी पुढे म्हणाली, 'मर्दानी 3' चा थरार हा मागील भागांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असेल. आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम कथा शोधली असून, ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी मला खात्री आहे.'
फ्रॅन्चायझीची यशस्वी वाटचाल
'मर्दानी' फ्रॅन्चायझी हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव महिला केंद्रीत कथानकावर आधारित ब्लॉकबस्टर फ्रॅन्चायझी म्हणून ओळखली जाते. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मर्दानी' ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या 'मर्दानी 2' ने या फ्रॅन्चायझीचा दर्जा अधिक उंचावला. आता 'मर्दानी 3' ही कथा आणखी पुढे नेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या प्रतिभांना संधी
यशराज फिल्म्सने 'मर्दानी 3' चे लेखन आणि दिग्दर्शनासाठी दोन नव्या प्रतिभावान व्यक्तींना संधी दिली आहे. 'द रेल्वे मेन' फेम आयुष गुप्ता यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी अभिराज मीनावाला यांनी घेतली आहे. अभिराज यांनी 'बँड बाजा बारात', 'सुलतान', 'जब तक है जान', 'टायगर 3' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
'मर्दानी 3' साठी प्रेक्षकांची उत्सुकता
'मर्दानी 3' च्या कथानकाबद्दल अद्याप अधिक माहिती उघड करण्यात आलेली नाही. मात्र निर्मात्यांनी हा चित्रपट थरारक, गडद आणि अधिक प्रभावी असल्याचे सांगितले आहे. राणी मुखर्जीनेही या भूमिकेसाठी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची तयारी केली आहे. एप्रिल 2025 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून, प्रेक्षकांना हा चित्रपट 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. चित्रपटाच्या थरारक आणि साहसी कथेची झलक लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे असून, 'मर्दानी 3' हा चित्रपट राणी मुखर्जीच्या चाहत्यांसाठी आणि थ्रिलर-प्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.