Neetu Kapoor Shares Video of Rishi Kapoor: बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षीच निधन झाले. ऋषी कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट देत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजही प्रेक्षक त्यांनी दिलेले चित्रपट आवडीने पाहतात. 'ल्यूकेमिया' (ब्लड कॅन्सर) या गंभीर आजारामुळे 30 एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. दोन वर्षांपर्यंत या आजाराचा सामना करत असतानासुद्धा त्यांनी आपले हसतमुख आणि उत्साही व्यक्तीमत्त्व कायम ठेवले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच केवळ हिंदी सिनेसृष्टीतीलच नव्हे देशभरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली होती.
ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर सुद्धा बॉलिवूडच्या नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनीदेखील बऱ्याच चित्रपटात काम करुन चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली. नीतू कपूर या नेहमी ऋषी कपूर यांच्या आठवणीत त्यांचे व्हिडीओ, फोटोज सोशल मिडीयावर शेअर करत असतात. चाहतेसुद्धा सोशल मीडियावरील ऋषी कपूरच्या आठवणींना पसंती दर्शवत असतात. नुकतंच, नीतू यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ऋषी कपूर यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर आपल्या आवडीचा पदार्थ खात हसताना दिसत आहेत.
नीतू कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऋषी कपूर यांचा एक गोड व्हिडीओ शेअर केला. ज्यावेळी ऋषी कपूर हे आजाराच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कला होते, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर आपल्या आवडत्या चविष्ट बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ही बिर्याणी चित्रपट निर्मात्या स्वाती शेठी यांनी ऋषी यांच्यासाठी बनवली होती. बिर्याणी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ऋषी म्हणत आहेत, 'हे खूप चांगले आहे. उत्कृष्ट, धन्यवाद'.
त्याच वेळी, नीतू कपूर देखील त्यांच्या आनंदात सहभागी होत्या. ऋषी कपूर यांचा आनंद पाहून त्यांनाही खूप बरे वाटत होते. हा व्हिडिओ शेअर करताना नीतू यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "@samasastories यांनी न्यूयॉर्कमध्ये असताना ऋषी कपूर यांच्यासाठी जेवण बनवले होते." ऋषी कपूर यांना 2018 साली 'ल्युकेमिया' हा आजार झाल्याचे समोर आले. त्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले आणि तिथे त्यांनी जवळपास एक वर्ष घालवले.
आजाराच्या उपचारादरम्यान ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला तसेच त्यांच्यासोबत राहिले. सप्टेंबर 2019 मध्ये ऋषी कपूर भारतात परतले. त्यावेळी त्यांनी पुन्हा चित्रपट आणि त्यांच्या चाहत्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची तब्येत खालावतच राहिली आणि अखेर 30 एप्रिल 2020 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांच्या उत्साही आणि हसतमुख व्यक्तीमत्त्व आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.