Nitin Gadkari Watch Emergency: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत हीने राजकारणात सुद्धा स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत छाप सोडणारी ही अभिनेत्री आता तिच्या 'इमरजेंसी' या आगामी चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनली आहे. 'इमरजेंसी' हा चित्रपट 17 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रदर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करत अखेर हा चित्रपट 17 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी नागपूरात खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अशातच त्यांनी सोशल मिडीयावरसुद्धा याचे फोटोज शेअर केले होते.
सोशल मिडीयावरील चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या या फोटोज मध्ये कंगना रणौत नितिन गडकरी यांच्यासोबत चित्रपटासंदर्भात गप्पा मारताना दिसत आहे. यादरम्यान कंगनाने आपल्या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. कंगना म्हणाली, "हा चित्रपट माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडला गेला आहे आणि माझ्या मनात खोलवर रुजला गेला आहे. तसेच माझ्या या भावना चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची मी वाट पाहत आहे." सोशल मिडीयावर शेअर केलेल्या फोटोज मध्ये कंगना थिएटर मध्ये नितिन गडकरींसोबत बसल्याची दिसत आहे. त्यांच्या बाजूला अनुपम खेरसुद्धा असल्याचं फोटोज मध्ये दिसत आहे. सर्वच चित्रपटाविषयी गप्पा मारत आहेत आणि स्क्रीनिंगदरम्यानच्या या फोटोजवरुन नितिन गडकरींना हा चित्रपट आवडल्याचं स्पष्ट होत आहे.
11 जानेवारीला कंगनाने सोशल मिडीयावर फोटोज शेअर केले होते. यावेळी कंगनाने छान साडी घातली होती. नागपूरात नितिन गडकरींसाठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवली असल्याचं कंगना रणौतने सांगितलं. तसेच, काही दिवसांपूर्वी कंगना अनुपम खेरच्या आई, दुलारी खेर यांना भेटायला गेली होती. त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओसुद्धा अनुपम यांनी शेअर केला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते, 'कंगना आणि दुलारी: डोंगराळ भागातील दोन सशक्त महिला'. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कंगनाच्या चाहत्यांमध्ये सुद्धा प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा: अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका
कंगना रणौतने या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शनसुद्धा केले आहे. या चित्रपटात 1975 मध्ये भारतात लागलेल्या आणीबाणीवर प्रकाश टाकला आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असून त्या काळातील राजकीय घटनांना उजाळा देणारा आहे. या चित्रपटात कंगनाने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, अशोक छापडा, महिमा चौधरी, सतिश कौशिक आणि मिलिंद सोमन सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.