बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अभिनेता अजय देवगणसह 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कॅश' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात कलाकांराची फौज होती, ज्यामध्ये अजय देवगणही होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला तर नाहीच पण दुसरीकडे अनुभव सिन्हा आणि अजय देवगण यांचे संबंध बिघडले. आपल्यात आणि अजयमध्ये काहीही बोलणं झाला नसल्याचा खुलासा अनुभव सिन्हा यांनी केला आहे. आपण अनेकदा संभाषण व्हावं यासाठी प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं. पण नेमकं या नाराजीमागील कारण काय आहे?
अनुभव सिन्हा यांनी सांगितलं की, "अजय आणि माझ्यात काही बोलणं झालेलं नाही. तो माझ्याशी काही बोलत नाही. मला माहिती नाही. असंही नाही की, आम्ही एकमेकांसमोर उभे आहोत आणि माझ्याशी बोलत नाही. असंही असू शकतं की मीच माझ्या मनात एखादी धारणा केली असावी. मी त्याला एकदा दोन वेळा आपण भेटूयात असा मेसेज केला होता. त्याने त्याचं उत्तर दिलं नाही, तेव्हा मी समजून गेलो की त्याला माझ्याशी बोलायचं नाही. असंही असू शकतं की त्याच्या डोक्यातून निघून गेलं असेल. कदाचित त्याने मेसेज वाचला नसेल. पण 2007 पासून आजपर्यंत आमच्यात काहीच बोलणं झालेलं नाही. आता त्याला 18 वर्षं झाली आहेत".
अजयसोबत नेमकं काय भांडण आहे? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "काही झालं नव्हतं. त्या चित्रपटादरम्यान निर्माते आणि फायनान्सर यांच्यात दुमत झालं होतं. त्यावेळी ना मी प्रोड्यूसर-फायनान्सर होतो, ना अजय देवगण. ना कोणत्या गाण्याच्या शुटिंगवरुन वाद झाला होता. आता काय कारण होतं हे जाणून घेण्यासाठी भेटावं लागेल. अजय माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी आहे. त्याच्यासह असताना मजा येते. तो मित्रांचा मित्र टाइप आहे. जर एखादा मित्र अडचणीत असेल तर अजय सर्वात आधी त्याच्यासाठी उभा राहतो".
"मध्यंतरी राजकीय मुद्द्यावरुन मी अनेक लोकांना बरंच काही बोललो होतो. कदाचित त्यालाही बोललो असेन. इतरांनाही बोललो आहे, पण सर्वांशी चांगले संबंध आहेत. आता हा कोणता ठराविक मुद्दा नाही की अनुभव तू पिवळं जॅकेट का घातलंस आणि मी म्हटलं की नाही घालणार. मला अजय देवगण आवडतो. एक अभिनेता आणि व्यक्ती म्हणून मी त्याचा फार आदर करतो," असं अनुभव सिन्हा म्हणाले.
अनुभव सिन्हा यांनी अजय देवगणसह कॅश चित्रपटात काम केलं आहे. 2007 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अजयसह सुनील शेट्टी, जायद खान, शमिता शेट्टी, दिया मिर्झा, ईशा देओल अशी कलाकरांची फौज होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला होता.