अटक वॉरंट प्रकरणावर सोनू सूदने सोडलं मौन, पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अटक वॉरंटबद्दल पहिली प्रतिक्रिया देत त्याने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 8, 2025, 12:34 PM IST
अटक वॉरंट प्रकरणावर सोनू सूदने सोडलं मौन, पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी title=

Arrest Warrant Against Actor Sonu Sood: गोरगरिबांसाठी देवदूत ठरणारा अभिनेता सोनू सूद  सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे अभिनेत्याला मिळालेलं अटक वॉरंट. अभिनेत्याला अटक वॉरट जारी होताच मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. लुधियाना ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांनी हे अटक वॉरंट दिलं आहे. अभिनेत्याने या प्रकरणी आपले मौन सोडले आहे.  या प्रकरणी आता सोनू सूदने वॉरंटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता सोनू सूदने त्याच्या एक्स अकाऊंटवर मिळालेल्या अटक वॉरंटवर त्या प्रकरणात त्याचा थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या खूप खळबळजनक आहेत. स्पष्टपणे सांगायचे झाले तर, माननीय न्यायालयाने आम्हाला एका तृतीय पक्षाशी संबंधित प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावले आहे. ज्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. 

त्याचबरोबर सोनू सूदने पुढे सांगितले की, आमच्या वकिलांनी त्या समन्सला प्रतिसाद दिला आहे. मी 10 फेब्रुवारी रोजी माझे म्हणणे नोंदवेन. ज्यामध्ये मी स्पष्ट करेन की माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. आम्ही त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्याच्याशी संबंधित नाही. हे सर्व फक्त मीडियाचे आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केले जात आहे. सेलिब्रिटींना सॉफ्ट टार्गेट बनवणे हे खूप दु: खद असल्याचं म्हणत सोनू सूदने नाराजी व्यक्त केली आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

हे प्रकरण मल्टी-लेव्हल मार्केटिंगशी संबंधित आहे. ज्यामध्ये लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी जुलै 2023 मध्ये मोहित शुक्ला नावाच्या व्यावसायिका आणि त्यांच्या कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये मोहितने मार्केटिंगच्या नावाखाली फसवणूक केली आणि नंतर पैसे परत करण्यास नकार दिल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी तपासादरम्यान सोनू सूदचे नावही या प्रकरणात जोडले गेले. 

रिपोर्टनुसार, सोनू सूद हा आरोपीच्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. याच कारणामुळे सोनू सूदला या प्रकरणात साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, वारंवार अभिनेत्याला समन्स बजावून देखील सोनू सूद न्यायालयात हजर राहिना नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.