'इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो...' दिल्लीतील पराभवानंतर महाराष्ट्रातील नेत्याकडून घरचा आहेर!

Delhi Election 2025:  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 8, 2025, 02:05 PM IST
'इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो...' दिल्लीतील पराभवानंतर महाराष्ट्रातील नेत्याकडून घरचा आहेर! title=
रोहीत पवार

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल स्पष्ट झाले असून भाजप 48 तर आम आदमी पार्टी 22 जागांवर पुढे असल्याचे दिसतंय. यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असून आम आदमी पार्टी पराभवाच्या छायेत आहे. या निकालानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आम आदमी पार्टीच्या पराभवाची कारणे सांगितली जात आहेत. दरम्यान आम आदमी पक्षाच्या पराभवाला इंडिया आघाडीतील नेत्यांचा इगो जबाबदार असल्याचे मत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी मांडलाय. काय म्हणाले रोहीत पवार? जाणून घेऊया 

रोहीत पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती, असे ते म्हणाले. 

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या #महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती,असे रोहीत पवार म्हणाले. परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, असे म्हणत त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी, असेही ते पुढे म्हणाले.

केजरीवालांचा पराभव 

भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवतानाच दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत. आपचा हुकुमी एक्का असलेले केजरीवाल पराभूत झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.केजरीवाल 12 व्या फेरीनंतरही पिछाडीवर होते. 12 फेऱ्यांनंतर ते 3 हजार मतांनी पिछाडीवर होते. मतमोजणीची शेवटची फेरीमध्ये केजरीवाल यांनी बरेच मतं भरुन काढली. मात्र शेवटच्या फेरीनंतरही भाजपाचे परवेश वर्मा यांनी 1200 मतांनी विजय मिळवला असून हा दिल्ली निवडणुकीमधील सर्वात मोठा उलटफेर असल्याचं मानलं जात आहे.

अण्णा हजारेंची प्रतिक्रिया 

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, 'दारू त्यांच्या डोक्यात शिरली, दारूचं दुकान डोक्यात शिरलं. जशी करणी तशी भरणी. दारूचे मोठ्या प्रमाणात लायसन दिले गेले हे कितपण योग्य आहे. याबाबतचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्यांना पत्र सुद्धा लिहिलं मात्र त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही'.