कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या भोसरी मधल्या महालात राजा राम अर्थात महेश निराश मुद्रेने बसला होता... रामाचे सल्लागार मंडळ अर्थात चाणक्य प्रसाद आणि कार्तिक ही वारंवार आपल्या निष्ठावान शिलेदारांची नावे वाचत होते आणि अत्यंत केविलवाण्या नजरेने एकमेकांकडे पाहत होते....!
पिंपरी चिंचवडच्या गेल्या महिन्यापासूनतिजोरीच्या चाव्या आपल्या हातात येतील तिथं समाविष्ट गावाचं प्रतिनिधित्व करणारा आपला निष्ठावान शिलेदार राहुल अर्थखाते सांभाळेल हे स्वप्न दोघे चाणक्य आणि दस्तुरखुद्द राजा महेश अर्थात राम पाहत होता.
पण हाय रे कर्म.... तिजोरीच्या चाव्या तर मिळाल्याचं नाहीत पण मानहानीकारक पराभव झाल्याचं शल्य राजा महेश आणि चाणक्य प्रसाद आणि कार्तिकला वाटू लागलं.....! नगरीचे दुसरे राजे लक्ष्मण यांनी अखेरच्या क्षणी डावपेच टाकत सलग दुसऱ्यांदा आपल्या दुसऱ्या निष्ठावान विनायकाला सवाई अर्थमंत्री करत तिजोरीच्या चाव्या 'ममता" रुपान आपल्याच हातात घेतल्या आणि राम अर्थात महेशला चारी मुंड्या चीत केले असं चित्र नगरीत निर्माण झाले...! आणि त्यामुळे राम आणखी हवालदिल होत होता..
हे घडलं कसं याचा विचार राम करू लागला आणि त्याच्या पुढे सम्राट देवेंद्र यांच्या दरबारातला प्रसंग आठवला...! पिंपरी चिंचवड नगरीच्या अर्थ खात्याची जबाबदारी आपल्याच निष्ठवंताला दिली पाहिजे हे आपण सम्राट देवेंद्र यांना कसे सांगितले, त्यानंतर राजे लक्ष्मण यांनी आता ही जबाबदारी चिंचवड निष्ठावंताना देणे कसे गरजेचे आहे हे सम्राटांना सांगितले....!
पहिला अर्थमंत्री राजे लक्ष्मण यांचा निष्ठावंत असला तरी तो आपल्या भोसरी परगण्यातला होता आणि तोच धागा पकडत राजा लक्ष्मणाने आपला घात केल्याचे शल्य राजा महेश अर्थात रामाला बोचू लागले....लक्ष्मणाच्या युक्तीवादानंतर आपण हतबल झालो खरे पण सम्राटाला आपण आपलं शल्य बोलून दाखवल खरं...
मी आपला निष्ठावान पण माझे ही निष्ठवंत आहेत...त्यांच्याच जीवावर मी आमदार झालोय...! त्यांना फसवलं तर माझी अवस्था विलासी होईल, केवळ तुमच्या शब्दांमुळ माघार घेतो पण निष्ठावंतांची प्रतारणा नाही...! हा प्रसंग राजा महेश अर्थात रामाच्या डोळ्यासमोरून गेला आणि तरी ही राजे लक्ष्मण जिंकल्याचे चित्र हा विचार त्याला दु:खी करून गेला...!
राजा महेश हा विचार करत असताना तिकडे केवळ कमळाच्या निष्ठेवर नगरीचे अर्थमंत्री पद मिळेल अशी आशा बाळगलेल्या शीतल विलास च्या मनात ही असंख्य विचारांनी काहूर माजले होते..!
आपण अर्थमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले होते तर माशी शिंकली कुठे असा प्रश्न दोघांना पडला....अरे महेश अर्थात रामाने बंड केले तर त्यांच्या निष्ठावाणाला निवडणुकीच्या रिंगणात का नाही ठेवले...? असे असंख्य प्रश्न दोघांना पडले....त्याच वेळी राम आणि लक्ष्मणाने आपल्याला वेड्यात तर काढले नाही ना असा प्रश्न त्यांना पडला...हा विचार त्यांच्या मनात चालू असताना पिंपरी चिंचवड नगरीची प्रजा मात्र हा तमाशा शांत चित्ताने पाहत होती.