सर्फराज सनदी आणि प्रताप नाईक (प्रतिनिधी) सांगली \ कोल्हापूर : कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवायला एका प्रकारे कर्नाटक सरकारला हिरवा कंदील मिळालाय. मात्र यामुळं सांगली, सातारा कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरलीय.
सांगली कोल्हापुरात महापुराचं हे चित्र भविष्यात अजूनही भयानक दिसू शकतं. कारण कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. धक्कादायक म्हणजे याला कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आणि केंद्रिय मंत्र्यांनी दिलीय. म्हणजेच राज्य सरकारनं अलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध केला नाही. त्यामुळे याबाबत समिती स्थापन करण्याची गरज नाही असं थेट जल लवादाने सांगून टाकलंय. जल लवादाची ही भूमिका म्हणजे कर्नाटक सरकारला आलमट्टीची उंची वाढविण्याच्या भूमिकेला हिरवा कंदील दिल्यासारखं आहे.
अलमट्टी धरणाची उंची 519 वरुन 524 मीटरपर्यंत वाढवणार आहे. उंची 5 मीटरनं वाढली तर उत्तर कर्नाटकातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार. सध्या सांगलीच्या पलूसपर्यंत अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर येतं. त्यामुळे कोल्हापूरच्या नरसोबाच्या वाडीपर्यंत मोठा फुगवटा निर्माण होतो. 2005,2019, 2021 ला अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर येऊन हाहाकार झाला होता. उंची 5 मीटरनं वाढवल्यास सांगली, कोल्हापूर कराडला महापुराचा धोका निर्माण होणार आहे. सांगलीला ,महापुराचा धोका 70 ते 80 टक्के निर्माण होण्याची शक्यता आहे. तर सांगलीच्या पलूसपर्यंतचं बॅकवॉटर कराडपर्यंत जाण्याची भीती उपस्थित केली जातेय. महापुराच्या भीतीमुळेच आता कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीही आक्रमक झालीय. त्यांनी सरकारला खडे बोल सुनावलेत.
खरंतर कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत आवाज उठवून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले होतं. तरीही सरकारने यात कोणताच हस्तक्षेप का केला नाही असा सवाल विचारला जातो आहे. इतकंच नाही आता जल लवादानं हे संकेत दिल्यावरही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी संभ्रम निर्माण करणारी उत्तरं दिली आहेत.
कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळं आणि अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळं सांगली कोल्हापुरात पूरस्थिती दरवर्षीची झालीय. त्यात 2019 च्या महापुरात तर दोन्ही जिल्ह्यात मिळून 50 लोकांचा बळी गेला होता. या महापुराला सर्वस्वी जबाबदार कर्नाटक सरकार आणि अलमट्टीचं बॅकवॉटर होतं. आता जर अलमट्टीची उंची 5 मीटरनं वाढली तर महापुराचं काय चित्र असेल याची कल्पनाही न केलेली बरी. तेव्हा उद्याचा धोका ओळखून किमान आता तरी राज्य सरकारनं तातडीने हस्तक्षेप करून जल आयोगाकडे धाव घेण्याची गरज आहे. नाहीतर अलमट्टीचं पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेकडो गावांच्या जीवावर उठेल हे नक्की.