Donald Trump Share Market Impact : जागतिक स्तरावर मागील काही दिवसांमध्ये एकाच घटनेवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. हा प्रसंगच मुळात अतीव महत्त्वाचा आणि भविष्यातील जागतिक राजकारणावर परिणाम करणारा होता. कारण, हा प्रसंग होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचा.
सोमवारी, अर्थात 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आणि त्याचा थेट परिणाम गुंतवणूक क्षेत्रावर झाला. जागतिक स्तरावर सुरू असणाऱ्या या घडामोडींमुळं भारतातील शेअर बाजार आणि गुंतवणूकदारही सतर्क झाले, परिणामी मंगळवारी शेअर बाजार थेट 1235 अंकांनी कोसळला.
मागील 7 महिन्यांपासूनचा नीचांक शेअर बाजारानं गाठला जिथं ICICI Bank आणि Reliance समुहासारख्या मोठ्या संस्थांनाही धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. फक्त या कंपन्याच नव्हे, तर मंगळवारी सर्वाधिक घट झोमॅटोच्या शेअरमध्ये नोंदवण्यात आली असून, इथं ही घसरण 11 टक्के असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय अदानी पोर्ट्स, एसबीआय यांच्या शेअरमध्येही घसरगुंडी पाहायला मिळाली.
अपवाद ठरले ते म्हणजे आयटी, मेटल, फार्मा, हेल्थकेअर, ऑटो आणि ऑइल, गॅस या क्षेत्रातील शेअर. जिथं 0.4 ते 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. जाणकारांच्या मते जागतिक स्तरावर असणारी आर्थिक अनिश्चितता, नफ्यावर येणारी मर्यादित वाढ यामुळंच सध्या शेअर बाजार क्षेत्रात गुंतवणुकदारांमध्ये साशंकता पाहायला मिळत आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातही घसरण नोंदवली जात असून, 20 जानेवारी 2025 पर्यंत परदेशी गुंवणुकदार संस्थानी जवळपास 48023 कोटींची विक्री केली आणि याच मोठ्या दबावामुळं शेअर बाजार घसरला असाही अंदाज वर्तवला जात आहे.
अमेरिकेतील अधिकृत आकडेवारीनुसार साधारण 48 लाखांहून अधिक भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकेत वास्तव्यास असून, त्यामध्ये अमेरिकेत जन्मलेल्या आणि परिणामी त्यामुळं नागरिकत्वं मिळालेल्यांचं प्रमाण अधिक आहे. पण, ट्रम्प यांच्या येण्यानं एच 1बी व्हिसाधारकांप्रमाणं तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. वरील व्हिसाधारकांच्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाल्यास त्यांना या देशाचं नागरिकत्वं मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.