कोण होता सुचिर बालाजी? 26 व्या वर्षी का केली आत्महत्या? चॅट जीपीटीशी काय कनेक्शन? जाणून घ्या!

Suchir Balaji: भारतीय वंशाच्या 26 वर्षीय सुचिर बालाजीने आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Dec 14, 2024, 01:10 PM IST
कोण होता सुचिर बालाजी? 26 व्या वर्षी का केली आत्महत्या? चॅट जीपीटीशी काय कनेक्शन? जाणून घ्या! title=
सुचिर बालाजी

Suchir Balaji: भारतीय वंशाच्या अमेरिकत असलेल्या सुचिर बालाजीच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये 26 नोव्हेंबरला सापडला होता. आता त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली असून त्याने आत्महत्या केल्याचे  मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने (OCME)  म्हटले आहे.  26 वर्षीय सुचिर बालाजीच्या निधनानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुचिर बालाजी हा ओपनएआयचा संशोधक होता. तो जवळपास चार वर्षे सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये होता आणि त्याने शेवटचे 18 महिने ChatGPT साठी घालवले. बालाजीने ऑगस्टमध्ये ChatGPIT बनवणाऱ्या OpenAI या कंपनीचा राजीनामा दिला होता.  नोकरी सोडताना त्याने कंपनीवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केला होता. त्याच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आणि नेटकऱ्यांनी एआयबद्दल चिंता व्यक्त केली.  

कोण आहे सुचिर बालाजी?

कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर असलेल्या बालाजीने आपल्या महाविद्यालयीन काळात OpenAI आणि Scale AI मध्ये इंटर्नशिप केली होती. 2019 मध्ये तो OpenAI मध्ये नोकरी करु लागला. कंपनीत त्याने चार वर्षे काम केले. या कालावधीत, GPT-4 चे प्रशिक्षण आणि ChatGPT ची कामगिरी सुधारण्यासह अनेक प्रकल्पांवर त्याने काम करत महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने यावर्षी ऑगस्टमध्ये ओपनएआयची नोकरी सोडली आणि संभाव्य नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली. 'जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही कंपनी सोडली पाहिजे.', असे तो नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल न्यूयॉर्क टाइम्सशी बोलला होता.

सुचीरने OpenAI मध्ये काय केले?

ओपनएआयमध्ये असताना सुचिर बालाजीने चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाणारा इंटरनेट डेटा संकलित आणि व्यवस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावली. लोकप्रिय AI मॉडेल्स तयार करण्यात त्याच्या कामाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

सुचिर का आला होता चर्चेत?

चॅटजीपीटी तयार करण्यासाठी पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींचे कॉपीराइट केलेले साहित्य वापरण्यात आले आहे. ज्याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि व्यापारांवर होणार आहे. OpenAI विरुद्ध चालू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये त्याचे ज्ञान आणि साक्ष यांचा मोठा प्रभाव पडू शकतो, असे सुचिरने म्हटले होते. OpenAI च्या कार्यपद्धती धोकादायक होत्या. कारण त्यांनी AI मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी परवानगीशिवाय कॉपीराइट केलेला कंटेट वापरला होती, असे सुचिरने म्हटले होते. त्याने AI च्या नैतिक परिणामांबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली होती. एआयमुळे संपूर्ण इंटरनेट इकोसिस्टमला हानी पोहोचवू शकते, अशी भीती त्याने व्यक्त केली होती. ओपनएआयचे बिझनेस मॉडेल अस्थिर आणि इंटरनेट इकोसिस्टमसाठी अत्यंत हानिकारक आहे, असे त्याने म्हटले होते. 

सुचिर लहानपणापासून AI मध्ये सक्रिय

सुचिर बालाजींचे बालपण क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे गेले. यानंतर यूसी बर्कले येथे त्याने कॉम्प्युटर सायंटिस्टचा अभ्यास केला. कॉलेजमध्ये असताना त्याला AI ची आवड निर्माण झाली. रोग बरा करणे आणि वृद्धत्व थांबवणे यासारख्यावर त्याने AI संबंधित संशोधन केले होते.