मुंबई : अफगाणिस्तानमध्ये अचानक झालेल्या सत्तांतरानंतर तेथील रहिवाशांचे जीवन बदलले आहे. येथील सर्वसामान्य तर सोडाच, येथील राजकीय आणि मोठ-मोठ्या लोकांचे आयुष्य देखील असे काही बदलले आहे. ज्याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसावा. अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री खालिद पायेंदा यांच्यासोबत देखील असाच प्रकार घडला आहे. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली की, त्यांच्यावर चक्कं उबेर कॅब चालवण्याची वेळ आली आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेण्यापूर्वीच खालिदने देश सोडला होता.
द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री, ज्यांनी एकेकाळी काबुलमध्ये $6 बिलियनचे बजेट सादर केले होते, परंतु आता ते आता आपलं घर चालवण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमध्ये उबेर कॅब चालवत आहेत.
खालिदने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, तालिबानने अफगाणिस्तानच्या ताब्यात घेतल्याबद्दल ते अमेरिकेला जबाबदार मानतात. दोन दशकांच्या युद्धानंतर, अमेरिकन सैनिक ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून त्यांच्या मायदेशी परतले. ज्यामुळे अफगाणिस्तानावर अशी वेळ आली.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये दहशतवादी गटाशी शांतता करारावर स्वाक्षरी केली. त्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेण्याच्या बाबात लिहिले गेले होते. ज्यामध्ये त्यांनी 14 महिन्यांत अमेरिकन सैन्य बाहेर काढण्याचेही आश्वासन तालिबान्यांना दिले होते.
खालिद सांगतात की, तालिबानने सत्ता हाती घेण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अफगाणिस्तानच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ते म्हणाले, लेबनॉनमधील एका कंपनीला पैसे देता आले नाहीत आणि त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष घनी माझ्यावर रागावले. त्यांनी मला खूप खोटे पाडले, ज्यामुळे मला राजीनामा देऊन निघावं लागलं.
खालिद यांनी सांगितलं की, ते आणि त्यांचं कुटुंब ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानातून अमेरिकेत पोहोचले होते.
द वॉशिंग्टन पोस्ट'शी संवाद साधताना खालिद म्हणाला, 'येत्या दोन दिवसांत मला 50 ट्रिप पूर्ण करायच्या आहेत. तरच मला 95 डॉलर चा बोनस मिळेल. त्यांनी सांगितले की, घरात पत्नी आणि चार मुले आहेत. त्यांच्यासाठी मला अजूनही काम करावं लागणार आहे.