अलीकडेच जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी एका मोठ्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार होत असलेले 'मिरर-इमेज' बॅक्टेरिया जीवाला धोका निर्माण करू शकतात. ' सायन्स ' जर्नलमध्ये प्रकाशित पॉलिसी फोरममध्ये हा इशारा देण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 'मिरर-इमेज' बॅक्टेरियामध्ये निसर्गात आढळणाऱ्या जैविक रेणूंची उलट रचना असते. जर हे जीवाणू वातावरणात स्थापित झाले तर ते मानव, प्राणी आणि वनस्पतींच्या रोगप्रतिकारक शक्तीला वेगळे करू शकतात. यामुळे घातक संक्रमण होऊ शकते, ज्याचा सामना करणे शक्य होणार नाही.
'मिरर-इमेज' जीवाणू म्हणजे काय?
सर्व जैविक रेणू, जसे की प्रथिने, DNA आणि RNA विशिष्ट दिशेने रचलेले असतात. ही दिशा डावीकडे किंवा उजवीकडे असते. मात्र 'मिरर-इमेज' जीवाणूंमध्ये याउलट रचना असते. वैज्ञानिक अशा जीवाणूंवर काम करत आहेत, ज्यांचे सर्व जैविक रेणू उलट दिशेने तयार केले जातील. सध्या 'मिरर-इमेज' प्रथिने आणि अनुवांशिक रेणू प्रयोगशाळेत तयार झाले आहेत, मात्र परिपूर्ण 'मिरर-इमेज' जीव निर्माण करण्याचा टप्पा अजून गाठलेला नाही. पुढील दशकांमध्ये हे शक्य होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
संभाव्य धोका
युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे प्रो. वॉन कूपर यांचे म्हणणे आहे की, हे जीवाणू मानवी रोगप्रतिकारक यंत्रणा ओलांडून शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे अत्यंत घातक संक्रमण होऊ शकते. येल विद्यापीठातील प्रो. रुस्लाम मेडझिटोव्ह यांनी चेतावणी दिली की, अशा जीवाणूंचा प्रसार जर माती किंवा धुळीत झाला, तर पर्यावरण कायमचे दूषित होऊ शकते. त्याचा परिणाम इतका घातक असू शकतो की तो पृथ्वीवरील जीवनासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो.
उपाय आणि आवाहन
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी अशा जीवाणूंवरील संशोधन थांबवण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत या जीवांमुळे धोका नसल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यावर बंदी घालावी, असे त्यांनी सुचवले आहे. वैज्ञानिकांनी जबाबदारीने संशोधन करावे, तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने करावा. जगभरात या मुद्द्यावर चर्चा आणि उपाययोजना राबवण्याची वेळ आली आहे.