Education News : शालेय जीवनात असताना अनेकांनाच गणित (Maths), बीजगणित (Algebra), भूमिती (geometry) हे विषय फारसे रुचत नाहीत. 'गणित हा माझा आवडता विषय आहे' असं त्यातूनही कोणी म्हणालं की त्या व्यक्तिकडे लगेचच सर्वांच्या नजरा वळतात. अशा या विषयासाठी कैक वर्षांपासून गणिततज्ज्ञांनी मोलाचं योगदान देत संपूर्ण जगाला आणि या जगातील विद्वानांना अवाक् केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे पायथागोरस. जगविख्यात पायथागोरस यांनी दिलेली प्रमेय आजही अभ्यासक्रमाचा भाग आहेत. किंबहुना याच प्रमेयांच्या आधारावर अनेक गणितांची उत्तरं सापडतात. पण, गेल्या 2000 वर्षांपासून पायथागोरसचं एक असं प्रमेय होतं, ज्याचा सिद्धांतच सापडत नव्हता. भल्याभल्यांचे प्रयत्न इथं फसले.
अशा या पायथागोरस यांच्या साधारण 2 हजार वर्षांपूर्वीच्या प्रमेयाविषयी आता दोन शालेय मुलींनी एक नवा सिद्धांत मांडत नवा दावा केला. न्यू ऑरलेन्स इथं असणाऱ्या सेंट मेरी अकॅडमी या माध्यमिक शाळेतील क्लेसिया जॉन्सन आणि नेकिया जॅक्सन या मुलींनी हे प्रमेय एका नव्या रुपात मांडत त्रिकोणमितीमधील एक समीकरण वेगळ्या अंदाजात सादर केलं.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनीही या दोन्ही विद्यार्थिनींची दखल घेत त्यांच्या यशासाठी पाठीवर शाबासकीची थाप दिली. आपल्या वाट्याला आलेल्या या आनंदाविषयी या दोघीही व्यक्त झाल्या. 'इतक्या कमी वयातील विद्यार्थ्यांना हा सिद्धांत मांडता येणं ही बाब अकल्पनीय आहे', असं सांगताना जॉन्सननं याचं श्रेय शिक्षकांना दिलं.
काटकोन त्रिकोणासंदर्भातील a^2+b^2=c^2 या प्रमेयाचे अनेक सिद्धांत आजवर मांडण्यात आले आहेत. पण, या दोन्ही विद्यार्थिनींनी त्यांच्या तल्लख बुद्धीच्या बळावर या प्रमेयाच्या सिद्धांताचा एक वेगळंच रुप दिलं आहे. जिथं त्रिकोणमितीमध्ये पायथागोरसचे प्रमेय त्याचाच एक भाग समजले जातात तिथं पायथागोरसच्या प्रमेयाचा सिद्धांत मांडण्यासाठी मात्र त्रिकोणमितीचा वापर केला जात नाही. कारण इथं अनेक समीकरणंच बदलतील. इथं तर्क असा असतो जिथं सिद्ध झालेल्या गोष्टीसंदर्भातील शक्यता सिद्ध करण्यासाठीच्या गोष्टीवर अवलंबून असते.
या दोन्ही शालेय विद्यार्थिनींनी केलेल्या दाव्यानुसार या प्रमेयाचा सिद्धांत मांडण्यासाठी त्रिकोणमितीतील ज्या नियमांचा वापर त्यांनी इथं केला आहे ते पायथागोरसच्या प्रमेयाचा भागच नव्हते. सध्या या दोन्ही विद्यार्थिनींच्या दाव्यासंदर्भातील काही मतमतांतरं आणि विविध पैलूही समोर येत आहेत. पण, या प्रमेयाप्रती आणि एकंदरच गणित विषयाप्रती या मुलींची रुची पाहून अनेकांनाच त्यांचं कौतुक वाटत आहे.