कायदा हे आरोपींना शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी असतो. पण अनेकदा या कायद्याचा गैरफायदा घेत निर्दोष व्यक्तींना त्यात अडकवलं जातं. कायदा आपल्या बाजूने असल्याचा फायदा घेत अनेक लोक एखाद्या व्यक्तीला ठेस पोहोचवण्याच्या हेतूने त्याचा गैरवापर करतात. अमेरिकेतील असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
13 मार्च 2006 रोजी क्रिस्टल मंगम आणि आणखी एका डान्सरला अमेरिकेतील एका पार्टीत परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पार्टीचे आयोजन ड्यूक युनिव्हर्सिटीच्या लॅक्रॉस खेळाडूंनी केलं होतं. परफॉर्मन्सनंतर, मंगमने आरोप केला की डेव्हिड इव्हान्स, कॉलिन फिनर्टी आणि रीड सेलिगमन या तीन खेळाडूंनी तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण अनेक वर्षे चालले आणि नंतर हा आरोप खोटा असल्याचं उघड झाले. त्यामुळे खेळाडूंवरील आरोप वगळण्यात आले. डरहम काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी माइक निफॉन्ग (जे या प्रकरणात क्रिस्टल मंगमचे वकील होते) यांनाही या प्रकरणात पुरावे लपवल्याबद्दल बडतर्फ करण्यात आले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीन खेळाडूंवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या क्रिस्टल मंगमला खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. नुकतंच क्रिस्टल मंगमने एका मुलाखतीत संपूर्ण सत्य उघड केले आणि म्हणाली - 'मी त्या खेळाडूंबद्दल खोटे बोलले. त्यांनी माझ्यावर बलात्कार केला नाही. मी त्यांच्यावर प्रेम करते हे त्यांना कळावे अशी माझी इच्छा होती. ते या शिक्षेस पात्र नव्हते. आशा आहे की तिन्ही लोक मला माफ करतील".