World Cup : जागतिक स्तरावर सध्या क्रीडा क्षेत्रामध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची (ICC). या खेळालाही राजकारण, पारंपरिक स्पर्धा या आणि अनेक गोष्टींची किनार मिळताना दिसत आहे. त्यातच सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचंही नाव सातत्यानं पुढे येताना दिसत आहे. यातलंच एक नाव म्हणजे बाबर आझम.
पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि पाकिस्तानी टेलिव्हीजन प्रेझेंटर झैनब अब्बास यांच्यामध्ये झालेला (तत्कालीन) ट्विटरवरील संवाद आता पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे. एकिकडे झैनबच्या नावाला “anti-India and anti-Hindu" वादाचं वलय मिळालेलं असतानाच हे ट्विट आता आणखी चर्चेत आल्याचं दिसत आहे.
बाबर आणि झैनबचं नाव या वादाच्या भोवऱ्यात समोर आलं असलं तरीही त्याला संदर्भ आहे तो म्हणजे 2018 चा. ज्यावेळी बाबर आझमनं दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये कमाल शतक झळकावलं होतं. त्याचवेळी झैनबनं त्याचा उल्लेख करताना त्याला प्रशिक्षक Mickey Arthur यांचा मुलगा म्हणून संबोधलं होतं. प्रशिक्षकाशी बाबरचं असणारं नातं तिला इथं अधोरेखित करायचं होतं.
बाबरनं तिचं वक्तव्य फार मनावर घेतलं नाही, पण त्यानं त्यावर उत्तर मात्र दिलं. तिनं मर्यादा ओलांडल्याचं बाबरनं वक्तव्यातून स्पष्ट केलं. 'काहीही बोलायच्या आधी तुम्ही विचार करा, मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करु नका', असं तो म्हणाला होता. आता हे काही वर्षांपूर्वी घडलेलं प्रकरण पुन्हा प्रकाशात येण्यामागचं कारण म्हणजे झैनबवर झालेली कारवाई आणि भारत तातडीनं सोडण्याची तिच्यावर आलेली वेळ.
कोण आहे झैनब अब्बास?
सध्या सुरु असणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी क्रीडा पत्रकार आणि टीव्ही प्रेझेंटर झैनब अब्बालसला भारत तातडीनं सोडण्यास सांगितलं आणि तिनं सर्वांच्या नजरा वळवल्या. सोशल मीडियावर तिनं भारत आणि हिंदूंविरोधात केलेल्या एका जुन्या ट्विटमुळं तिच्यावर हा रोष ओढावला होता. ज्यामुळं अखेर तिला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता.