Rohit Sharma: दुखापत टीम इंडियाची (Team India) पाठ सोडताना काही दिसत नाहीये. भारतीय खेळाडूंना होणारी दुखापत ही सध्या चिंतेचा विषय बनली आहे. दुखापतीमुळे टीम इंडियातून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तसंच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील बाहेर आहे. दिवसेंदिवस दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढताना दिसतेय. याबाबत आता रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी वर्कलोड सांभाळण्याची जबाबदारी आयपीएल फ्रँचायझी मालकांवर आणि खेळाडूंवर असणार आहे.
बुधवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. वनडे सिरीजमध्ये मिळालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला की, हे फार चिंताजनक आहे. टीम इंडियामध्ये आम्हाला अशा खेळाडूंची कमी जाणवतेय, ज्यांना खरं तर प्लेईंग 11 मध्ये असायला हवं.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, हे सर्व खेळाडू प्रौढ आहेत. त्यामुळे ते त्यांच्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकतात. जर त्यांना फीटनेस बद्दल काहीही वाटलं, जसं की, क्रिकेट जास्त खेळलं जातंय, तर त्याबाबत ते बोलू शकतात. अशा परिस्थितीत एक-दोन सामने ते बाहेर बसू शकतात. मात्र मला शंका आहे की असं होईल.
मुळात या सर्व गोष्टी फ्रेंचायझीवर अवलंबून आहे. खेळाडूंवर आता फ्रेंचायझींचे अधिकार आहेत. याबाबत आम्ही त्यांना काही प्रमाणात संकेत दिलेत. शेवटी फ्रँचायझीचा निर्णय असणार आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंच्या शरीराची काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी आहे, असंही मत रोहितने मांडलं आहे.
प्रत्येकजण खेळाडूंना फीट ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतायत. याशिवाय आम्ही खेळाडूंच्या मॅनेजमेंटकडे खूप लक्ष देत आहोत, असंही रोहितने सांगितलंय.
ऑस्ट्रेलियाविरूद्धत्या तिन्ही सामन्यात सूर्या शून्यावर बाद झाला. यावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये सूर्यकुमार यादव केवळ 3 बॉल खेळू शकला. सूर्याची ही खेळी फार दुर्दैवी आहे. मुळात तो ज्या 3 बॉलवर आऊट झाला ते बॉल उत्कृष्ट होते. फलंदाजीला आल्यावर त्याने चुकीचे शॉट निवडले.
रोहित पुढे म्हणाला, आम्ही सूर्याला ओळखतो आणि तो स्पिनरविरूद्ध चांगला खेळतो. सूर्यासारखी परिस्थिती कोणत्याही खेळाडूवर उद्भवू शकते. सूर्याकडे क्वॉलिटी आणि क्षमता या दोन्ही गोष्टी आहेत.