थरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट

विनोद कांबळीचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर येऊनही त्यांच्या तब्बेतीत फार सुधारणा दिसत नाही. वानखेडे स्टेडिअमच्या 50 व्या वर्धापन सोहळ्यातील गावस्करांसह विनोद कांबळीची उपस्थिती. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 15, 2025, 12:59 PM IST
थरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट  title=

विनोद कांबळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याला कारण म्हणजे त्याची तब्बेत. पण आज विनोद कांबळी खूप दिवसांनी क्रिकेटच्या मैदानावर दिसला आहे. याला निमित्त आहे रविवारी वानखेडे स्टेडिअमचा 50 वा वर्धापन सोहळा पार पडला हे. वर्धापन दिनानिमित्त झालेल्या उद्घाटन समारंभात मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमात विनोद कांबळी देखील उपस्थित होता. 

विनोद कांबळी काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून घरी गेला होता. पण या व्हिडीओतून त्याची आताची हेल्थ अपडेट कळत आहे. ज्या पद्धतीने तो स्टेजवर गेला त्यावरुन तो अजूनही थकलेला असल्याचं दिसत आहे. कांबळीचा हात धरून दोन लोकांनी त्याला स्टेजवर आणले. त्याला नीट चालताही येत नव्हते. त्यानंतर विनोद कांबळी स्टेजवर आला आणि त्याने गावस्करांना पाहता क्षणीच त्यांच्या पाया पडले. 

विनोद कांबळीला 21 डिसेंबर रोजी ठाण्यातील रुग्णालयात तब्बेत बिघडल्यामुळे ICU मध्ये दाखल केलं होतं. यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. 

विनोद कांबळीचं विधान 

हा सन्मान स्वीकारल्यानंतर, कमालीने या ऐतिहासिक मैदानावरील त्याच्या खेळण्याच्या दिवसांबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'मला आठवतंय की, मी इंग्लंडविरुद्ध येथे माझे पहिले द्विशतक झळकावले होते आणि त्यानंतर माझ्या कारकिर्दीत अनेक शतके झळकावली होती. जर कोणाला माझ्यासारखे किंवा सचिन (तेंडुलकर) सारखे भारतासाठी खेळायचे असेल, तर मी तुम्हाला कठोर परिश्रम करत राहण्याचा सल्ला देईन आणि ते करणे कधीही थांबवू नका कारण आम्ही दोघेही लहानपणापासून हेच ​​करत आलो आहोत.

सचिनसोबतचा भावूक क्षण 

अलिकडेच विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकरसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये, सचिन त्याच्याकडे येताच. तो सचिनचा हात धरतो आणि काही सेकंदही सोडत नाही. खरंतर, सचिन आणि कांबळी यांची ही भेट बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात झाली. हे दोन्ही खेळाडू रमाकांत आचरेकर यांचे शिष्य आहेत.