भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार

India Beats Bangladesh: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 20, 2025, 10:02 PM IST
भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार

India Beats Bangladesh: आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 229 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने 46.3 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. 5 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी आणि संयमी फलंदाजी करणारा शुभमन गिल विजयाचे खरे शिल्पकार ठरले. दरम्यान आता भारतीय संघाचा पुढील सामना पाकिस्तानशी होणार आहे. 23 फेब्रुवारीला दोन्ही संघ भिडणार आहेत. 

बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर तो अयोग्य ठरत होता. याचं कारण त्यांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये आघाडीचे फलंदाज गमावले. त्यांची स्थिती 15 ओव्हर्समध्ये 62 वर 5 विकेट्स अशी होती. पण तोहिद हृदोय आणि झाकेर अली यांच्या भागीदारीने बांगलादेश संघाला तारलं. तोहिद हृदोयने शतक ठोकलं. यानंतर पुन्हा विकेट्स पडू लागल्या आणि सर्व संघ बाद झाला. भारतासमोर 229 धावांचं आव्हान उभं करण्यात आलं होतं. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. रोहित शर्माने झेल सोडल्याने अक्षर पटेलची हॅटट्रीक हुकली. 

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली होती. रोहित शर्मा 41 धावा करुन बाद झाला. यानंतर विराट कोहली 22, त्यापाठोपाठ श्रेयस आणि अक्षर पटेलनेही विकेट गमावल्या. पण दुसरीकडे शुभमन गिल संयमी खेळी करत होता. त्याने आपलं शतकही पूर्ण केलं. के एल राहुलसह त्याने विजयी भागीदारी केली. शुभमन गिल 101 धावांवर नाबाद राहिला. 

भारतीचा प्लेईंग 11 -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

बांगलादेशची प्लेईंग 11 -

तन्झीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.