Massive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानच्या संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये केलेली कामगिरी पाहून पाकिस्तानी चाहते कमालीचे निराश झाले आहेत. बाबार आझमच्या नेतृत्वाखालील संघाला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये चक्क अमेरिकेसारख्या नवख्या संघाने पराभवाचा धक्का दिला. साखळी फेरीमध्ये अ गटात पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. चारपैकी पाकिस्तानने दोन सामने जिंकले आणि दोन गमावले. मात्र सुपर 8 आधीच संघ स्पर्धेतून बाहेर पडल्याने संघावर चौफेर टीका होताना दिसत आहे. अगदी चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी पाकिस्तानी संघावर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानी संघाविरुद्ध इतका संताप व्यक्त करण्यामागील कारण म्हणजे एकदा टी-20 चं जेतेपद पटकावणाऱ्या या संघाला सुपर ओव्हरमध्ये अमेरिकने पराभूत केलं. याच पराभवामुळे सुपर 8 आधी पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानी संघाबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न आणि अॅडम गिलक्रिस्टबरोबर चर्चा करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने आपल्याच संघाची लाज काढली. हाफीज हा नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान पाकिस्तानी संघाचा निर्देशक होता. तसेच तो या काळात तत्पुरत्या स्वरुपाचा प्रशिक्षकही होता.
पाकिस्तानी संघाबद्दलचा एक किस्सा सांगताना हाफीजने, "मी तुला सांगतो गिली (गिलक्रिस्ट), आम्ही कसोटी क्रिकेट खेळताना सामन्यादरम्यान आमच्या संघातील काही खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये झोपलेले असायचे. 4 ते 5 खेळाडू सामना सुरु असताना ड्रेसिंग रुममध्ये झोपायचे. आता मी हे संघाचा निर्देशक म्हणून सहन करावं का?" असा प्रश्न उपस्थित केला. हे ऐकून वॉर्ननेच, 'ते थकलेले असायचे का?' असं हाफीजला विचारलं.
नक्की वाचा >> Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..
"मला नेमकं ठाऊक नाही. मी ड्रेसिंग रुममध्ये गेलो आणि मला तिथे कसोटी सामना सुरु असताना 4 ते 5 खेळाडू झोपलेले दिसले. मी ते पाहून, 'तुम्ही हे कसं करु शकता?' असा प्रश्न केला. तुम्ही हे असं काही करणार असाल तर तुम्ही या संघाचा भाग असू शकत नाही. सामना सुरु असताना तुम्ही लक्ष केंद्रित करुन सामना पाहणं अपेक्षित असतं. सामाना सुरु असताना तुम्ही हेच करणं अपेक्षित आहे. सामना संपल्यानंतर तुम्ही तुमच्या खासगी आयुष्यात काहीही करा, मी त्यात कधीच दखल देणार नाही. मात्र साम्याच्या वेळी तुम्ही सर्वांनी खेळावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. संवाद साधला पाहिजे. तुम्ही वेगवान गोलंदाज असाल तर आराम करु शकता. आईस बाथ घेऊ शकता पण तुम्ही क्रिकेटवरच लक्ष दिलं पाहिजे. समोरचा संघ काय करतोय यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही सामना सुरु असताना तुम्ही गाशा गुंडाळून झोपू शकत नाही. मात्र दुर्देवाने माझी ही भूमिका प्रसारमाध्यमांना पटली नाही," असं हाफीजने सांगितलं.
Hafeez just told 4/5 players were sleeping in the middle of a test match, that's 2 are batting so that's 4/5 players awake. pic.twitter.com/74mJAozfuy
— Zak (@Zakr1a) June 20, 2024
मागील 2 ते 3 वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर बाबर आझमकडून कर्णधारपद काढून ते शाहीन शाह आफ्रिदीला सोपवण्यात आलं. मात्र टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर पुन्हा कर्णधार पद बाबरला देण्यात आल्याने आफ्रिदी नाराज असल्याची चर्चा होती.