आयपीएल 2024 पासून भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर चर्चेत आलाय. खरं तर रिपोर्टनुसार मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. बीसीसीआयने गंभीरच्या अटी मान्य केल्या असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असं म्हटलं जातंय.
गौतम गंभीरने 2007 आणि 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिलंय. तरदुसरीकडे एक मार्गदर्शक म्हणून त्याने कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरला 10 वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात यश मिळालं. शाहरुख खानसोबत सर्वांची मनं त्याने जिंकली. अशातच गौतमने धोनीबद्दल मोठं विधान केलंय.
एका टॉक शोमध्ये गौतमने खुलासा केलाय की, त्याला कोणत्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात खेळण्यात सर्वाधिक मजा आली. गंभीरने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक कॅप्टनच्या नेतृत्त्वात खेळला आहे. पण त्याने या मुखातीत एमएम धोनीचं कौतुक केलंय. तो म्हणाला की, हा वादग्रस्त प्रश्न असून मला प्रामाणिकपणे हेडलाइन द्यायचे नाहीत, पण प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमकुवतता होती. मी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. मी अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम कामगिरी केली. तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली माझा चांगला टप्पा अनुभवलाय. सर्वाधिक काळ मी एमएसच्या कर्णधारपदाच्या नेतृत्त्वात खेळलो. मला MS सोबत खेळताना आणि त्याने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले त्याबद्दल आनंद वाटतो.
42 वर्षीय गौतम गंभीरने 2004 ते 2016 दरम्यान भारतासाठी 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामन्यात आपल्या खेळाच प्रदर्शन केलंय. तर कसोटीत 4154 धावा, वनडेत 5238 धावा आणि टी-20 मध्ये 932 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. गंभीरने कसोटीत 9 शतकं आणि एकदिवसीय सामन्यात 11 शतकं झळकावलीय.