Blue Ghost नं टीपला पृथ्वीचा वेग; अवकाशात हा ग्रह फिरताना कसा दिसतो? साऱ्या जगानं पाहिला हा Video

Blue Ghost : नासाच्या नेतृत्त्वाअंतर्गत सुरु असणाऱ्या ब्लू घोस्ट मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरु होण्याआधीच या मोहिमेनं जागतिक स्तरावर सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत. 

सायली पाटील | Updated: Feb 4, 2025, 02:52 PM IST
Blue Ghost नं टीपला पृथ्वीचा वेग; अवकाशात हा ग्रह फिरताना कसा दिसतो? साऱ्या जगानं पाहिला हा Video  title=
Space news Science Blue Ghost captures stunning video of earth latest update

Blue Ghost : पृथ्वीसह अवकाशातील प्रत्येक ग्रहाविषयी मानवाला कुतूहल वाटतं. पण, यातही जीवसृष्टीचं अस्तित्वं असणारा एकमेव ग्रह म्हणून या पृथ्वीभोवची कायमच कुतूहलाचं वलय पाहायला मिळालं आहे. हीच पृथ्वी 24 तासांत स्वत:भोवतीची एक फेरी, तर 365 दिवसांत सूर्याभोवतीची एक संपूर्ण फेरी पूर्ण करते. बहुतांश क्षेत्र पाण्यानं व्यापलेल्या या ग्रहाची प्रत्यक्षातील दृश्य तुम्ही कधी पाहिलीयेत? 

फार दुर्मिळ आणि अतिशय अद्भूत अशीच ही दृश्य पहिल्यांदाच जगासमोर आली असून, खासगी अवकाशसंशोधन संस्था फायरफ्लाय एरोस्पेसनं ही दृश्य नुकतीच सर्वांच्या भेटीला आणली आहेत. चंद्राच्या दिशेनं आपल्या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करण्याआधी Blue Ghost lunar lander नं अवकाशातल्या त्या अंधकारमय विश्वात निळ्या रोषणाईमध्ये चकाकणाऱ्या पृथ्वीची छाया टीपली आहे. 

15 जानेवारी 2025 रोजी सुरु झालेल्या या मोहिमेअंतर्गत अगदी सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये 'ब्लू घोस्ट'नं महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या लँडरनं पआता पृथ्वीची कक्षा सोडली असून, ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पुढे मार्गस्थ झालं आहे. नासाच्या Commercial Lunar Payload Services (CLPS) initiative अंतर्गत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : CIDCO च्या 'या' घरांचा वाली कोण? रेल्वेस्थानक, रुग्णालयं, मंडई जवळ असूनही ही परिस्थिती; का मिळत नाहियेत अर्जदार? 

ब्लू घोस्टच्या लँडरला चंद्राच्या कक्षेसह त्याच्या जिओफिजिकल गुणधर्मांचं परीक्षण करण्यासाठी त्यावर अद्ययावर उपकरणं लावण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठावर राहून दोन आठवडे कार्यरत राहत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती निरीक्षणातून समोर येणार आहे. साधारण 60 दिवसांसाठी ब्लू घोस्ट सुरू राहणार असून, त्याची संभाव्य लँडिंग 2 मार्च 2025 रोजी होईल असं सांगितलं जात आहे.