दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने जबरदस्त कामगिरी करत वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने सेंच्युरिअन कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. दक्षिण अफ्रिका संघासमोर 148 धावांचं आव्हान होतं. सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात त्यांनी हे लक्ष्य पूर्ण केलं. दरम्यान दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे.
आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था एका क्षणी 99 धावांवर 8 गडी बाद अशी होती. पण मार्को जानसेन आणि कगिसो रबाडा यांनी 51 धावांची नाबाद भागिदारी करत संघाला विजयापर्यंत नेलं. रबाडा 31 आणि जानसेन 51 धावांवर नाबाद राहिले. जलदगती गोलंदाज मोहम्मद अब्बासने दुसऱ्या डावात 6 विकेट घेत पाकिस्तानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण रबाडा आणि जानसेनसमोर त्याचे प्रयत्न कमी पडले. आता दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 3 जानेवारीपासून केपटाउनमध्ये खेळला जाणार आहे.
वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रवेश केला आहे. पण त्यांच्यासमोर कोणत्या संघाचं आव्हान असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
South Africa are headed to Lord's for the #WTC25 Final
— ICC (@ICC) December 29, 2024
- भारतीय संघाला अंतिम फेरीत सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही कसोटी (मेलबर्नसह) जिंकाव्या लागतील. भारतीय संघाने एकही सामना ड्रॉ केला किंवा हरला तर त्याला इतर निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
- जर भारतीय संघाने मालिका 2-1 ने जिंकली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेत श्रीलंकेने किमान एक सामना अनिर्णित ठेवण्याची आशा करावी लागेल.
- ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास भारत 55.26 टक्के गुणांवर असेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 किंवा 2-0 अशी जिंकली तरच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
- श्रीलंकेविरुद्धची मालिका 0-0 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे भारतासारखे 53.51 टक्के गुण होतील. मात्र या चक्रात भारत अधिक मालिका जिंकण्याच्या जोरावर पुढे असेल. श्रीलंकेने मालिका 2-0 ने जिंकली तर ते भारताच्या पुढे जातील.
- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 ने गमावल्यास 51.75 टक्के गुणांसह अंतिम शर्यतीतून बाहेर पडेल.
कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतात.
सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टायसाठी 50 टक्के, ड्रॉसाठी 33.33 टक्के आणि पराभवासाठी शून्य टक्के गुण जोडले जातात. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण उपलब्ध आहेत आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण उपलब्ध आहेत. पॉइंट टेबलमधील रँकिंग प्रामुख्याने जिंकलेल्या टक्केवारीच्या आधारे निश्चित केली जाते.