मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाचे खेळाडू त्रिनिदादमध्ये पोहोचलेत. टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यासह वनडे मालिकेचा भाग नसलेले हे खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजमध्ये पोहोचताच रोहितने अशी कमेंट केलीये, ज्यामुळे तुम्हालाही हसू फुटणार आहे. रोहितने एका भारतीय खेळाडूला वेल्ला क्रिकेटर म्हणजेच रिकामटेकडा असं वर्णन केलं आहे.
ऋषभ पंत विंडीजला पोहोचताच खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसला. पंत इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून टीम इंडियातील अनेक खेळाडूंसोबत मजामस्ती करताना दिसला. या व्हिडीओची लाईव्ह क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतेय.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इतर अनेक भारतीय खेळाडू ऋषभ पंतच्या इंस्टाग्राम लाइव्हवर दिसले. या लाईव्ह दरम्यान रोहितच्या एका कमेंटने सोशल मीडियावर खळबळ उडालीये.
पंतच्या या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये युझवेंद्र चहलही होता. चहल या लाईव्हमध्ये येण्यापूर्वी टीमचा कर्णधार रोहित शर्मा मस्ती करताना दिसला. चहलबाबत बोलताना तो म्हणाला, 'चहल हा 21व्या शतकातील सर्वात 'वेल्ला' क्रिकेटर आहे.' रोहितने हे भाष्य विनोदी पद्धतीने केलंय. 'वेल्ला' हा शब्द काम नसलेल्या म्हणजेच रिकामटेकट्या व्यक्तीसाठी वापरला जातो.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव हे देखील 26 जुलै रोजी वेस्ट इंडिजला पोहोचलेत.
ही मालिका 29 जुलैपासून सुरू होणार आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. या मालिकेतील टीमची धुरा शिखर धवनच्या हाती आहे.